पुरस्कारांमध्ये गुणवंतांना जाणीवपूर्वक डावलले ः बानकर राहुरी पंचायत समितीच्या पुरस्कार वितरणावरुन आरोप
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी पंचायत समितीच्यावतीने गुणवंत कर्मचार्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा कौतुकास्पद उपक्रम असला तरी गुणवंतांना दिलेल्या पुरस्काराच्या यादीत मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी झाली असून यातून काही गुणवंतांना जाणीवपूर्वक डावलले असल्याचा आरोप पंचायत समितीचे सदस्य सुरेश बानकर यांनी केला आहे. दरम्यान, अन्य सदस्यांना विश्वासात न घेताच या पुरस्कारांची खिरापत वाटली असल्याची टीका बानकर यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बानकर यांनी म्हटले की, गुणवंत कर्मचार्यांचा सन्मान होणे ही चांगली बाब आहे. मात्र, काही गुणवंत असूनही त्यांना का डावलण्यात आले? यात पदाधिकार्यांची भूमिका मोठी संभ्रमात टाकणारी आहे. ज्यांना पुरस्कार मिळाला, त्यांच्याबाबत आपला आक्षेप मुळीच नाही. मात्र, तालुक्यातील वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रातील आशासेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस, गटप्रवर्तक, कृषी विभाग, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, महिला बचत गट, पशुसंवर्धन विभाग, परिचर, अशा विविध क्षेत्रातील गुणवंताची या यादीतून उपेक्षाच करण्यात आली आहे.
ज्यांनी करोना काळात आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी जिवाची पर्वा न करता चांगले काम केले, त्यांना या यादीतूनच हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर संबंधितांनी अन्यायच केला असल्याची भावना जनमानसांत तयार झाली आहे. ज्यांना पुरस्कार देण्यात आले, त्यांना सन्मानदिनाच्या अगदी पूर्वसंध्येलाच पुरस्काराची माहिती देण्यात येऊन ही संपूर्ण पुरस्काराची यादी व प्रक्रिया अत्यंत गोपनीय ठेवण्यात आल्याचा आरोप बानकर यांनी केला आहे. काही सदस्यांनी प्रत्येक अधिकार्याकडे जाऊन आपल्या जवळच्या लोकांची वर्णी या यादीत लावली आहे. प्रत्यक्षात पुरस्काराच्या घोषणेपूर्वी पदाधिकार्यांनी त्याबाबतची कल्पना अगोदर देऊन गुणवंत कर्मचार्यांचे प्रस्ताव मागविले नाहीत. मात्र, पुरस्काराची घाई का करण्यात आली? याबाबतचे गौडबंगाल काय? असा सवालही बानकर यांनी केला आहे. तर 13 मार्चला पंचायत समितीची मुदत संपली, अन् त्याचदिवशी पुरस्काराचे नाट्य रंगले, त्यातूनच मानापमानाची स्पर्धा सुरू झाली असल्याची टीका बानकर यांनी केली आहे.