संगमनेर तालुक्याच्या पठारभागात ‘कोविड’च्या नावाने चांगभलं! आता डी.सी.एच.सी.ची परवानगी घेताना नमूद केलेले तज्ज्ञ डॉक्टर एकदाही रुग्णालयात फिरकलेच नाहीत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातील साकूर येथे वरीष्ठ अधिकार्यांनी कोविड उपचार करणार्या दोन बेकायदेशीर रुग्णालयांवर व प्रयोगशाळांवर छापा घातला होता. यावेळी संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांनी या दोन्ही रुग्णालयांसह एका प्रयोगशाळेला ‘सील’ केले होते. आता या तिघांनाही ‘गुन्हा का दाखल होवू नये’ अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यासोबतच आता साकूरमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून येथील मातोश्री डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरने परवानगी घेताना रुग्णालयात ज्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियमित भेटीचा उल्लेख केला होता, ते डॉक्टर या रुग्णालयात एकदाही फिरकले नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डॉ.पवनकुमार खेमनर यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास गुन्हा दाखल करण्यासह ‘कोविड सेंटर’ची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या बुधवारी (ता.5) संगमनेरचे उपविभागाीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी तालुक्यातील पठारभागाचा दौरा करुन कोविड प्रादुर्भावासंदर्भात पठारभागातील आरोग्य सुविधांची तपासणी केली. यावेळी अनेक धक्कादायक गोष्टी वरीष्ठ अधिकार्यांच्या लक्षात आल्या. येथील डॉ.अविनाश प्रभाकर रासने हे आयुर्वेदाचार्य आपल्या रुग्णालयाची बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार नोंदणी नसतानाही त्यांच्या रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल असल्याचे व त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे अधिकार्यांना आढळले. याबाबत गुरुवारी (ता.6) तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांनी डॉ.रासने यांना 24 तासांत म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावली असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
यासोबतच साकूर येथील डॉ.संजय टेकुडे हे होमिओपॅथी डॉक्टरही आपल्या ओमसाई रुग्णालयात बॉम्बे नर्सिंग होमनुसार नोंदणी नसतांना कोविड रुग्णांवर उपचार करीत असतांना व त्यासोबतच परवानगी नसतांनाही ‘अॅलोपॅथी’ उपचार पद्धती वापरुन त्यानुसार उपचार करताना आढळले होते. यावेळी त्यांच्या रुग्णालयात अॅलोपॅथी औषधांचा साठाही आढळून आला होता. या प्रकरणी त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून सदरची औषधे कोठून आणली त्याची बिलासह सविस्तर माहिती, ज्या कोविड रुग्णांचे स्राव अहवाल पॉझिटिव्ह आले त्यांची चाचणी कोठून केली त्याची माहिती व याबाबत चंदनापूरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास सादर केलेल्या अहवालाबाबत विचारणा करण्यात आली आहे. 24 तासांत यासर्व गोष्टींचा खुलासा न केल्यास त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय कायद्यान्वये कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान अधिकार्यांना साईक्लिनिकल लॅबचाही संशय आल्याने तेथेही तपासणी करण्यात आली होती. यावेळी या लॅबमध्ये बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेल्या ‘रॅपिड अँटीजेन चाचणीच्या’ किट आढळून आल्या होत्या. विशेष म्हणजे या लॅबला ‘पॅरामेडिकल कौन्सिल अॅक्ट’नुसार कोणतीही मान्यता प्राप्त नाही. असे असतानाही या प्रयोगशाळेत कोविड संक्रमित रुग्णांच्या स्राव चाचण्या करण्यात येत होत्या. याबाबत या प्रयोगशाळेलाही 24 तासांत उत्तर देण्याची नोटीस देण्यात आली असून कोविड संशयीत रुग्णांच्या स्राव तपासणीसाठी रॅपीड किट कोठून खरेदी केल्या त्याचा बिलासह तपशिल, आजवर वापरलेल्या सर्व किटस्चा हिशेब व पॉझिटिव्ह/निगेटिव्ह निष्कर्ष आलेल्या रुग्णांच्या नोंदी राश्ट्रीय पोर्टलवर करण्यासाठी चंदनापूरीच्या आरोग्य केंद्राला अहवाल सादर केला असल्यास त्याची माहिती मागवण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास गुन्हा दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
पठारभागातील संपन्न बाजारपेठ असलेल्या साकूरमधील या तीन घटना कमी होत्या की म्हणून वरीष्ठ अधिकार्यांनी अधिकृत परवानगी घेतलेल्या डॉ.पवनकुमार खेमनर यांच्या मातोश्री रुग्णालयातही तपाणी मोहीम राबवून थेट दाखल असलेल्या रुग्णांशी तेथे मिळत असलेल्या सुविधांबाबत चौकशी केली. यावेळी संबंधित रुग्णालयाने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची परवानगी मिळवतांना सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर म्हणून डॉ.अजिंक्य म्हसे यांची नेमणूक केल्याचे म्हंटले होते. मात्र प्रत्यक्षात सदरचे कोविड रुग्णालय सुरु झाल्यापासून संबंधित डॉक्टरने एकदाही या रुग्णालयाला भेट दिल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे साकूरमधील इतर काही रुग्णालयांप्रमाणे येथेही केवळ रुग्णांकडून ‘मलिदा’ लाटण्याचाच प्रकार समोर आल्याने त्यांनाही नोटीस बजावून सुधारणा करण्यास बजावण्यात आले आहे, अन्यथा गुन्हा दाखल करुन रुग्णालयाची डेडिकेटेड कोविड सेंटरची मान्यता रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. तालुक्याच्या पठारभागात एकाच दिवशी या चार घटना समोर आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती.
एकीकडे बेकायदा वैद्यकीय व्यवसायांसह हलगर्जीपणाचा ठपका ठेवून एकाच ठिकाणच्या तीन रुग्णालयांसह एका प्रयोगशाळेला कारवाईचा इशारा देण्यात आलेला असतांना दुसरीकडे शिबलापूर येथे उपविभागीय अधिकार्यांनी स्वतः उघड केलेल्या मुन्नाभाईवर पाच दिवस उलटूनही अद्याप आश्वीच्या वैद्यकीय अधिकार्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. यावरुन तालुक्यातील काही खासगी रुग्णांलयांसह जनतेच्या पैशातूनच गलेलठ्ठ पगार घेणार्या अशा काही अधिकार्यांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे. महामारीच्या प्रकोपाने जनता सैरभैर असतानाही काही वैद्यकीय अधिकार्यांचा हा मुजोरपणा नागरी प्रकोपाचे कारण ठरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
वरीष्ठ अधिकार्यांच्या आदेशानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांनी तिघा बेकायदा वैद्यकीय व्यावसायिकांसह एका डेडिडकेटेड कोविड रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. यातील डॉ.रासने व डॉ.टेकुडे या दोघांकडे बॉम्बे नर्सिंग होम कायद्याप्रमाणे रुग्णालयाची नोंदणी नसताना व साई क्लिनिकल लॅबने पॅरामेडिकल कौन्सिल कायद्यान्वये नोंदणी केलेली नसतानाही या तिघांना केवळ साथरोग प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा ‘फुसका’ इशारा देण्यात आला आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळून केवळ मलिदा लाटण्यात मश्गुल असलेल्या या तिनही ठिकाणच्या संचालकांवर बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट व भारतीय दंड संहितेतील प्रचलित कायद्यान्वये कारवाई झाली तरच तालुक्यातून समोर येणारे असे बेकायदा उद्योग थांबतील. मात्र या संपूर्ण प्रकारात आता ‘अदृष्य’ हात दिसू लागला असून कोणतीतरी सामान्य जीवांचा खेळ करण्यासाठी या तिघांनाही सहिसलामत सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे.