तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर कालवश! वयाच्या 82 व्या वर्षी कोविड संक्रमणाने झाले निधन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी रंगमंचावर पाय ठेेवणार्‍या व आजच्या मितीस राज्यातील सर्वात मोठ्या तमाशा मंडळाच्या मालकीन असलेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत, राज्याचा पहिलाच विठाबाई नारायणगावकर पुरस्कार प्राप्त, तमाशा सम्राज्ञी श्रीमती कांताबाई सातारकर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी कोविडची लागण झाल्याने निधन झाले. त्या कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत्या. आज दुपारी त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच संपूर्ण संगमनेर शोकात बुडाले. गेल्या आठवड्यात त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील बहुतेक सर्व सदस्यांना कोविडची लागण झाली होती. त्यांच्यावर घरीच वैद्यकीय उपचार सुरु होत, त्या दरम्यानच आज सायंकाळी साउेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.


सन 1939 साली जन्मलेल्या श्रीमती सातारकर यांनी वयाच्या अवध्या नवव्या वर्षी नवझंकार मेळ्यातून रंगमंचावर पाय इेवला होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी आसपासच्या काही तमाशा मंडळांमध्ये कामही केले. 1953 साली त्यांनी तुकाराम खेडकर यांच्या तमाशा मंडळात काम सुरु केले आणि शेवटपर्यंत त्या या तमाशा मंडळाच्याच पाईक बनून राहील्या. 1954 साली त्यांनी तुकाराम खेडकर यांच्यासोबतच लग्नगाठ बांधली व त्या तुकाराम खेडकरसह कांताबाई साताकर या तमाशा फडाच्या मालकीन बनल्या. त्यांना अलका, अनिता, रघुवीर व मंदा अशी चार अपत्ये आहेत. आज ही सर्व मंडळी तमाशा मंडळातच काम करते व जवळपास अडिचशेहून अधिक लोकांचे प्रपंचही चालविते.


श्रीमती सातारकर यांनी तुकाराम खेडकर यांच्यासोबत पन्नासाहून अधिक सामाजिक, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक व प्रासंगिक वगातून मुख्य भूमिका बजावल्या आहेत. सन 1958 साली भालजी पेंढारकर यांनी त्यांना चित्रपटात काम करण्याविषयी विचारणाही केली होती. श्रीमती सातारकर आपल्या पहाडी आवाजातून पोवाडाही सादर करायच्या. त्यांच्या मुखातून सह्याद्रीच्या पराक्रमाचे गुणगान श्रवतांना श्रोते अक्षरशः भारावून जात असतं. तीन दशकांपूर्वी त्या संगमनेरात आल्या आणि संगमनेरच्याच झाल्या. येथील माती विषयी, माणसांविषयी त्यांच्या मनात प्रचंड जिव्हाळा होता. जीवनाचा राम आता संगमनेरातच असं त्या नेहमीच सहजपणे म्हणायच्या ते आज प्रत्यक्षात उतरल्याचे पाहून अनेकांच्या अश्रृंचा बांध फुटला.


श्रीमती सातारकर यांच्या अकस्मात मृत्यूने धक्का बसला आहे. कांताबाई सातारकर यांनी आयुष्यभर कलेची पूजा केली. शेतात राबणार्‍या बळीराजाच्या मनोरंजनाचे व्रत त्यांनी सलग सात दशके सांभाळले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककलेचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुखः व्यक्त केले आहे.

देशातल्या प्रत्येक राज्याला काही लोककला लाभल्या आहेत. या प्रत्येक लोककलेला कमीअधिक प्रमाणात लोकाश्रय मिळाला आहे. महाराष्ट्र मात्र याबाबतीत इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक समृद्ध आहे. इथे कितीतरी लोककला बहरल्या आहेत. यापैकी सर्वाधिक लोकप्रियता मिळालेला लोककलाप्रकार म्हणजे तमाशा. मराठी लोकरंगभूमीवर ज्या ज्या कलाकारांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडली आहे त्यातील खूप वरचे नाव म्हणजे कांताबाई सातारकर.


गुजरातमधील बडोदा जिल्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी जन्मलेया कांताबाईना तमाशाचा तसा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आईवडील सातारा या मूळगावी आले. इथे कांताबाई कोणत्याही गुरुविना छोट्या मित्र मैत्रिणींसमोर नृत्य सादर करता करता त्यांना नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरु झाला. छोट्यामोठ्या तमाशात काम करीत त्या खूप मोठी स्वप्ने घेऊन मुंबईला जाऊन पोहोचल्या. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात एक कलाकार म्हणून करता करता त्यांच्यातील अस्सल कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. असंख्य धार्मिक, पौराणिक, सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थियेटरला जाऊ लागला.


१९६४ मध्ये अचानक तुकाराम खेडकरांचे निधन झाले. आणि शब्दशः वनवास म्हणता येईल अशी अवस्था कांताबाईंच्या आयुष्यात आली. पण तमाशाच्या बोर्डावर शिवाजी संभाजी या पुरुषी भूमिका रंगवणाऱ्या कांताबाई खऱ्या आयुष्यातही तशाच धाडशी होत्या. कधीकाळी पतीच्या म्हणजे स्वतःच्याच तमाशा फडात काम केलेल्या कांताबाईंना दुसऱ्याच्या फडत काम करणे रुचत नव्हते. त्यांनी जिद्दीने पै-पै जमवून स्वतःचा तमाशा फड उभा केला. एका स्त्रीने परंपरेने वाट्याला आलेला सुतळीचा तोडाही न घेता स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला आणि पुढे अमाप लोकप्रियता मिळून आजही तेव्हढ्याच दिमाखात उभा असलेला एकमेव तमाशा फड हा कांताबाईंचाच.


एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित,अभिजित,नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. त्यांच्या जीवनावर डॉ संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आजवर चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमान त्यांना मिळाला आहे. असंख्य पुरस्कार, असंख्य मानसन्मान मिळवलेल्या या महान कलावतीला मात्र रसिकांचे प्रेम हाच आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान वाटतो.

Visits: 9 Today: 2 Total: 28809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *