‘महाराष्ट्र बंद’ला अकोले तालुक्यात चांगला प्रतिसाद ठिकठिकाणी मोर्चा काढून केंद्र सरकारचा नोंदवला निषेध
नायक वृत्तसेवा, अकोले
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून सोमवारी (ता.11) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला अकोले तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरासह राजूर, कोतूळ व देवठाण येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी तीन वाजता अकोले शहरात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाचे तहसील कार्यालयासमोर सभेत रूपांतर होऊन शेवटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू होती.
महाविकास आघाडीच्या या बंदला शेतकरी संघटना, किसान सभा, कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला होता. आंदोलनकर्त्या शेतकर्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेल्या अजय मिश्रा यांच्या मुलाने स्वतःची गाडी घालून जीवघेणा हल्ला केला. यात तब्बल 8 शेतकर्यांचा मृत्यू झाला. केंद्र सरकार दडपशाहीने शेतकरी आंदोलन मोडत आहे. आंदोलनकर्त्यांना चिरडून मारले आहे. या केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाच्या निषेधार्थ राज्यात महाविकास आघाडीने बंद पाळून निषेध केला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
अकोले तालुक्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. शहरातील व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. तसेच महाविकास आघाडी व किसान सभेच्यावतीने सकाळी 10 वाजता राजूर गावातून फेरी काढली. या फेरीचे रूपांतर राजूर ग्रामपंचायत समोर सभेत झाले. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, विनय सावंत, रवी मालुंजकर, शरद कोंडार, स्वप्नील धांडे, संतोष बोटे आदिंनी आंदोलनात भाग घेतला. राजूरचा आठवडे बाजार असतानाही राजूरकरांनी काही वेळ बंद पाळला. त्यानंतर दुकाने उघडून दिली आणि बाजारही सुरू केला. देवठाण व रुंभोडी येथेही बंद पाळण्यात आला. याचबरोबर अकोले शहरातून मोर्चा काढून तहसील कचेरीवर नेला. याठिकाणी झालेल्या सभेत आंदोलकांनी केंद्र सरकारच्या दडपशाहीविरुद्ध घोषणा देत आंदोलन केले. या मोर्चात देखील आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, काँग्रेस नेते मधुकर नवले, मीनानाथ पांडे, डॉ. अजित नवले, कॉम्रेड कारभारी उगले, भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे, सुरेश गडाख, विक्रम नवले, रामहारी तिकांडे, रवी मालुंजकर, प्रमोद मंडलिक आदिंसह महाविकास आघाडी व शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.