गुगल मॅपने दिला धोका; कार गेली थेट पाण्यात! कोतूळ येथील दुर्घना; एकाचा मृत्यू, दोघे बचावले
नायक वृत्तसेवा, अकोले
अनोळखी भागात प्रवास करताना रस्ता शोधण्यासाठी अनेकजण गुगल मॅप्सचा वापर करतात. मात्र, अनेकदा यामुळे फसगतही होऊ शकते. पिंपरी-चिंचवडच्या तिघा उद्योजकांना याचा असाच वाईट अनुभव आला. गुगलने त्यांना रस्ता दाखविला खरा पण तो थेट धरणात जाणारा होता. त्यामुळे त्यांची कार पाण्यात बुडाली. यात एकाचा मृत्यू झाला, दोघे मात्र, पोहून बाहेर आले.
अकोले तालुक्यातील कोतूळ येथे ही दुर्घटना घडली आहे. मूळचे कोल्हापूरचे मात्र सध्या पुण्यात स्थायिक असलेले तिघे उद्योजक मित्र विकेण्डला कळसूबाई शिखरावर पर्यटनासाठी निघाले होते. गुरू सत्याराज शेखर (वय 42) व समीर राजूरकर (वय 44) हे मित्र वाहनचालक सतीश सुरेश घुले (वय 34, रा.पिंपरी) यांच्यासह कारने (एमएच.14, केवाय.4079) निघाले होते. रस्ता माहिती नसल्याने त्यांनी गुगल मॅप्सचा अधार घेतला. गुगलने त्यांना जवळचा रस्ता म्हणून कोतूळहून अकोलेकडे जाणारा रस्ता दाखविला. वास्तविक हा रस्ता पावसाळ्यात बंद असतो. कारण त्यावरील पूल पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याखाली जातो. स्थानिक लोकांना याची माहिती असल्याने त्या रस्त्याने कोणी जात नाही. सध्याही या पुलावर सुमारे 20 फूट पाणी आहे. एक तर अंधार आणि रस्त्याची माहिती नाही. त्यामुळे गुगल मॅपवर विश्वास ठेवत घुले यांनी गाडी पुढे नेली. मात्र, ती थेट खोल पाण्यात गेली. गुरू शेखर व समीर राजूरकर यांनी कारमधून बाहेर पडत कशीबशी आपली सुटका करून घेतली. सतीश घुले यांचा मात्र मृत्यू झाला.
या पुलावर पाणी आल्यावर तो बंद असतो. मात्र, तेथे बांधकाम विभागातर्फे कोणतीही सूचना किंवा अडथळा उभारण्यात आलेला नाही. अंधारात नवख्या कार चालकाला याचा अंदाज आला नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. अपघाताची माहिती मिळाल्यावर परिसरातील लोक मदतीला धावली. अपघाग्रस्तांचे नातेवाईकही तेथे आले. पाण्यातून कार आणि चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.