प्राध्यापकाच्या घरी पडलेल्या दरोड्याचा अद्यापही तपास लागेना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांचा तीव्र संताप

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरानजीकच असलेल्या बोंबले वस्तीवरील प्राध्यापकाच्या घरावर पडलेल्या दरोड्याचा तपास पाच दिवस उलटूनही लागू शकला नाही. याबाबत पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ तपास चालू आहे या नावाखाली पोलीस नागरिकांची दिशाभूल करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

बेलापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक विठ्ठल सदाफुले यांच्या ऐनतपूर शिवारातील बोंबले वस्ती येथील शिक्षक कॉलनीतील घरी चोरट्यांनी दरोडा टाकून घरातील सोने, रोख रक्कम आणि अन्य वस्तू मिळून सुमारे सहा लाखांचा ऐवज लुटून नेला.

या घटनेस पाच दिवस उलटूनही पोलीस तपासात प्रगती करु शकले नाहीत. या अगोदरही निपाणी वडगाव येथील माजी उपसरपंचाच्या घरावर दरोडा पडला होता. त्याचाही तपास लागू शकला नाही. तसेच बस स्थानक शेजारीच असलेलले मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी एक लाखाहून अधिक ऐवज चोरुन नेला होता. मात्र यातील दोन घटनांना एक महिन्याच्या आसपास कालावधी लोटलेला असतानाही त्याचाही तपास करता आला नाही. साधे धागेदोरेही मिळून आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलिसांना विचारले असता या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. लवकरच तपास लागेल असे सांगितले जाते. या दरोड्यामुळे प्राध्यापकांच्या कुटुंबातील सदस्य घाबरलेले असून चोरट्यांचा तपास तातडीने लावावा, अशी मागणीही करत आहेत.

Visits: 132 Today: 1 Total: 1600746

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *