गणेगावात मतदान न केल्याने महिलेला मारहाण राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांना मतदान केल्याच्या रागातून दारुच्या नशेत एका विवाहित महिलेला शस्त्र व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील गणेगाव येथे घडली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, ग्रामपंचायत निवडणुकीतील रागाची धग अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी (ता.29) सायंकाळी साडेसात वाजता घडलेल्या या घटनेतील आरोपींची नावे प्रमोद प्रल्हाद कोबरणे, संदीप पोपट कोबरणे (दोघेही रा.ओहोळ वस्ती, गणेगाव) अशी आहेत.

या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रमोद कोबरणे व संदीप कोबरणे दारु पिऊन घरी आले. घरासमोर उभ्या असलेल्या सासूबाईस, तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत मला मतदान का केले नाही, अशी विचारणा केली. त्यावर आपण त्यांना, आम्ही कोणालाही मतदान करतो आमचा अधिकार आहे, असे म्हणाल्याचा राग आला. त्यावर त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हत्याराने डाव्या हाताला ओरखडत सासूबाईंना ढकलून दिले. तसेच, एकेकाचा काटा काढू, अशी धमकी दिली. यावेळी गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोतही हरवली आहे. या घटनेवरुन निवडणुकीनंतरही रागाची धग कायम असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे.
