संगमनेरच्या अमरधामला स्वर्गीय अशोक भुतडा यांचेच नाव द्यावे! त्यांच्याशिवाय शहरात एकही नाव समर्पक नसल्याची संगमनेरकरांची भावना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जात-पात, धर्म-पंथ असा कोणताही भेद न मानता मानवता हाच खरा धर्म अशी आयुष्यभर शिकवण देणारे आणि त्या सूत्रातच आयुष्यभर जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अशोक भुतडा. अगदी तरुणावस्थेपासून लोकांच्या दुखात धावून जाण्याची त्यांची प्रवृत्ती सामान्य असूनही त्यांच्यातील असामान्य वृत्तीचे दर्शन घडवणारीच ठरली. आजवर शेकडों मृतात्म्यांच्या देहाला शास्त्रोक्त अंत्यसंस्कार घडवून आणणारा हा अवलिया संगमनेरसारख्या प्रागैतिहासापासून अस्तित्त्वात असलेल्या नगरीतला रहिवासी असावा ही संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन या शहरात रहाव्यात यासाठी नूतनीकरणातून उभ्या राहीलेल्या संगमनेरच्या अमरधामला ‘स्वर्गीय अशोक भुतडा’ यांचे नाव देणे खरेतर या पवित्र जागेसाठीच मोठेपणाचे ठरेल.


अशोक भुतडा म्हणजे संगमनेरातील सामाजिक क्षेत्रात सर्वपरिचित असलेले व्यक्तिमत्त्व होते. समाज, राजकारण, पर्यावरण, संस्कृती अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची छाप हेच सांगते. भारदस्त आणि बिनधास्त आवाजाची देणगी लाभलेल्या अशोक भुतडा यांनी तारुण्यातच मृतात्म्यांच्या शांतीसाठी त्यांच्या देहाला विधीवत, शास्त्रोक्त अंत्यसंस्कार देण्याचे व्रत स्विकारले. गेल्या तीन-साडेतीन दशकांत त्यांनी संगमनेर व परिसरातील हजारों देहांना अग्निडाग देण्याच्या विधीत महत्त्वाची भूमिका बजावली. दुखातही आपलं वाटावं असं नातं निर्माण करणारा हा अवलिया शहरातील कोणाही इसमाला माहिती नाही असे क्वचितच एखादे उदाहरण असेल.


कोणत्याही कुटुंबाला वर्षभर येणारे सण-उत्सव आणि त्यांच्या पद्धती माहिती असतात. मात्र एखाद्याच्या कुटुंबात होणारा विवाह सोहळा असो अथवा कोणाचे निधन झाल्यानंतरचे सोपस्कार याबाबत बहुतेकांना फारशी माहिती नसते. त्यातच दुःखद् प्रसंगात तर आपला माणूस गेल्याच्या वेदनेत पुढचे सोपस्कार घडवून आणणे आणि ते देखील व्यवस्थित हा देखील त्या कुटुंबासमोर यक्षप्रश्‍नच असतो. अशावेळी केवळ एका निरोपावर हातातील सगळं काम सोडून धावणारा माणूस म्हणजे अशोक भुतडा. दिवस असो अथवा रात्र अशोकजींनी या कार्याला कधीही वेळेची मर्यादा येवू दिली नाही.


एखाद्याच्या निधनाची गोष्ट अशोकजींना समजली की ते अस्वस्थ होत. लागलीच ते मृताच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्त्वन करीत आणि तेथूनच पुढची सूत्रे हाती घेत. मृताला घरात करावयाचे विधी व अन्य सोपस्कार, अंत्ययात्रा व शेवटी वैकुंठधाममधील अग्निडाग या सगळ्या प्रक्रीयेत अशोकजींची भूमिका पाहून कोणालाही वाटावं ते दुःख झालेल्या परिवारातीलच एक असावे इतके ते त्या कुटुंबाशी एकरुप होत. मृत झालेल्या व्यक्तिला योग्य अंत्यसंस्कार मिळावेत यासाठी अशोकजी स्वतः सरण रचायचे, त्यासाठी लागणार्‍या लाकडांची निवडही त्यांचीच असे. त्यानंतर पाणी देण्याचा कार्यक्रम असो अथवा मुखाग्नी देण्याचा ते सगळंकाही त्या कुटुंबाकडून अगदी सहजपणे करवून घेत.


या दरम्यान मृतात्म्यासाठी श्रद्धांजलीचे कार्यक्रम असो अथवा सावडण्याच्या विधीची उद्घोषणा अशोकजी आपल्या खणखणीत आवाजात प्रत्येकाच्या कानापर्यंत तो निरोप पोहोचवायचे. अग्नीडाग दिल्यानंतर मृताच्या शांतीसाठी ते खणखणीत आवाजात श्रीमद् भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय म्हणत, मानव जातीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करीत. गेल्या तीन-साडेतीन दशकांत संगमनेरच्या या अवलियाने दहा-विस नव्हे तर शेकडों पार्थिवांचे अशाच शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार घडवून आणले. अमरधाममध्ये केवळ त्यांची उपस्थितीही दुःख झालेल्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरत. त्यांचे अकस्मात निधन संगमनेरातील अशा शेकडों कुटुंबांसह संगमनेरकरांना मोठा धक्का देणारे ठरले आहे.


आयुष्यभर अमरधामशी जणू जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या अशोकजींचे हे कार्य मानवधर्माची सर्वोच्च सेवा आहे. संगमनेर नगरपालिकेच्यावतीने सध्या संगमनेरच्या वैकुंठधामचे नूतनीकरण सुरु आहे. तेथे भव्य प्रवेशद्वारही उभारण्यात आले आहे. आयुष्यभर मृतांना अग्नीडाग देण्यासाठी, निस्पृह भावनेतून एकाच दिवसांत चार-चार वेळा मानवसेवेसाठी वैकुंठधाममध्ये उपस्थित राहणार्‍या या अवलियाचे नाव संगमनेरच्या वैकुंठधामच्या मुख्य प्रवेशद्वाराला दिले जावे अशी मागणी बहुतांशी संगमनेरकरांमधून समोर येत आहे. संगमनेर नगरपालिकेने संगमनेरकरांच्या भावनांचा विचार करुन त्याची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


आयुष्यभर संगमनेरच्या अमरधामशी जवळीक बाळगणारा अवलिया अशी ओळख असलेल्या स्वर्गीय अशोक भुतडा यांचे नाव संगमनेरच्या नूतन अमरधामला देणे संयुक्तिक ठरेल. या नावाशिवाय शहरात या ठिकाणाला देण्यासाठी दुसरे नाव असूच शकत नाही असा मतप्रवाह संगमनेरकरांमध्ये आहे. त्याचा आदर करुन संगमनेर नगरपालिकेने नूतनीकरण झालेल्या अमरधामच्या मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव द्यावे आणि आजवर त्यांनी केलेल्या मानवसेवेच्या ऋणातून अंशतः उतराई व्हावे अशी संगमनेरकरांची अपेक्षा आहे. पालिका प्रशासन संगमनेरकरांच्या भावना किती गांभिर्याने घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *