‘माहेश्वरी इंडियन्स’ने जिंकले आरपीएलचे विजेतेपद तर ‘माहेश्वरी वॉरियर्स’ ठरला उपविजेता संघ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूह यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राजस्थान प्रीमियर लीग या स्पर्धेचे विजेतेपद माहेश्वरी इंडियन्सने जिंकले. त्यांना विजेतेपदाची रोख रक्कम पंचवीस हजार रुपये आणि भव्य ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तर उपविजेता संघ माहेश्वरी वॉरियर्स यांना 15 हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि उपविजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
मालपाणी लॉन्सवर खास तयार करण्यात आलेल्या मैदानावर विजेतेपदाची ही लढत संपन्न झाली. प्रथम फलंदाजी करताना माहेश्वरी इंडियन्सने आठ षटकांमध्ये तब्बल 171 धावांचा डोंगर उभा केला. धावांचा पाठलाग करताना माहेश्वरी वॉरियरचा डाव 117 धावांवर संपुष्टात आला. विवेक नावंदर याने केवळ दहा चेंडूत अर्धशतक केल्याने त्याला सर्वाधिक जलद अर्धशतकाचा मानकरी हा बहुमान मिळाला. या स्पर्धेच्या दरम्यान उत्कृष्ट झेल पारितोषिक गणेश पोफळे याला, सलग तीन षटकार पारितोषिक विवेक नावंदर याला, सलग तीन बळी घेण्याचे पारितोषिक सीए. योगेश झंवर याला, सर्वोत्कृष्ट फलंदाज पारितोषिक सौरभ जाजू याला, सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक विवेक नावंदर याला आणि मालिकेचा मानकरी म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक विवेक नावंदर यास मिळाले. सामना जिंकताच माहेश्वरी इंडियन्सच्या खेळाडूंनी जल्लोष केला. विजेत्या संघास मालपाणी उद्योग समूहाचे संचालक व राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष कैलास राठी, शारदा नागरीचे उपाध्यक्ष सुमित अट्टल आणि कैलास आसावा यांच्या हस्ते 25 हजार रुपयांचा धनादेश आणि विजेतेपदाची तर उपविजेतेपदाची ट्राफी दिली. तसेच माहेश्वरी वॉरियर्सला 15 हजार रुपयांच्या धनादेशासह ट्रॉफी प्रदान केली. कोरोना विषयक शासनाने घालून दिलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करून चार दिवस ही स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. स्पर्धा यशस्वीतेसाठी जय मालपाणी, अक्षय कलंत्री, प्रतीक पोफळे, प्रतीक मणियार, संदीप लोहे, शुभम लोहे, व्यंकटेश लाहोटी, आशिष राठी, गणेश पडतानी, आनंद लाहोटी, प्रेम मणियार, कालिदास कलंत्री यांचा समावेश असलेल्या प्रकल्प समितीने विशेष परिश्रम घेतले.