आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याचा डाव उधळला! पोलीस अनभिज्ञ, मात्र कार्यकर्ते सतर्क; सोशल माध्यमातून ओकत होता आग..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वर्षभरापूर्वी ऑगस्टमध्येच झालेल्या प्रकरणाची पुनरावृत्ती होताहोता टळली असून ऐनवेळी पोलिसांनी झडप घालीत संशयीताला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र तत्पूर्वी प्रसंगाच्या शोधात असलेल्या कथित संशयीताला आमदार समर्थकांनी पकडून बेदम चोपल्याने ऐन तिसर्या श्रावणी सोमवारी गर्दीने गजबजलेल्या खांडेश्वर मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत प्रसाद गुंजाळ नामक तरुणाला ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे याच तरुणाने वर्षभरापूर्वीही आमदार खताळ यांच्यावर हल्ला केला होता, त्यावेळी सुरुवातीला आर्थिक कारणातून सदरचा प्रकार घडल्याचे चित्र रंगवले जात असताना पोलीस तपासात या प्रकरणाचे धागेदोरे थेट माजीमंत्र्यांच्या स्वीय्य सहाय्यकापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली होती. यावेळीही आमदार खांडेश्वर मंदिरात येणार असल्याची त्याला पूर्वमाहिती मिळाल्याने संशय निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आरोपी गेल्याकाही दिवसांपासून त्याच्या सोशल खात्यावरुन सातत्याने सूचक इशारे देत होता, मात्र पोलीस त्याबाबत अनभिज्ञच राहिल्याचे दिसून आले. तर, त्याचवेळी आमदारांचे समर्थक मात्र सतर्क असल्याचे त्याला झालेल्या मारहाणीतून स्पष्ट झाले आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.31) सकाळी साडेदहाच्या सुमारास खांडेश्वर मंदिराच्या आवारातच घडला. आज श्रावणमासातील तिसरा सोमवार असल्याने संगमनेरचे आमदार अमोल खताळ सपत्निक खांडेश्वराच्या अभिषेकासाठी मंदिरात आले होते. त्यावेळी वर्षभरापूर्वी 28 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सवातील एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्यावर हल्ला करणारा आणि त्यानंतर दीर्घकाळ कारागृहात घालवलेला प्रसाद बापूसाहेब गुंजाळ (वय 23, रा.खांडगाव) तेथे वावरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. मात्र त्यांना त्याच्याकडून एखादा प्रकार घडेल याचा अंदाज नसल्याने त्यांनी खबरदारी म्हणून केवळ त्याला मंदिरातून बाहेर जाण्यास सांगितले.

मात्र त्यानंतरही तो मंदिर परिसरातच वावरत असल्याने त्याच्या मागावर असलेल्या आमदार खताळ समर्थकांनी त्याला गचांडून मारहाण करण्यास सुरुवात केली. श्रावणातला तिसरा सोमवार असल्याने आज खांडेश्वर परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी असल्याने या प्रकारातून एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मंदिरातच हजर असलेल्या पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह कर्मचार्यांनी तत्काळ ‘त्या’ ठिकाणी धाव घेत संशयीत प्रसाद गुंजाळ याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. मात्र ठाण्यात येताच आरोपीने बचावात्मक पवित्रा घेत आपण खांडगावचे स्थानिक नागरिक असल्याने मंदिराच्या पसिरात वावरण्याच्या कृत्याचे समर्थन करीत आपणास विनाकारण मारहाण करणार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची भूमिका मांडू लागला. या प्रकाराने पोलिसही गोंधळले असून त्याच्याकडून कोणतेही कृत्य घडलेले नसताना त्याच्यावर काय कारवाई करावी आणि त्याला झालेल्या मारहाणीच्या तक्रारीवर काय भूमिका घ्यावी अशा पेचात पोलीस अडकले आहेत.

वास्तविक पाहता गेल्यावर्षी 28 ऑगस्टरोजी मालपाणी लॉन्स येथे संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेल्या आमदार अमोल खताळ यांच्यावर आरोपी प्रसाद बापूसाहेब गुंजाळ याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात सुरुवातीला त्याला नागरिकांकडून चोप बसल्यानंतर खासगी सुरक्षारक्षक व पोलिसांनी त्याला सुरक्षित त्यांच्या तावडीतून सोडवून नाट्यमय घडमोडीनंतर रात्री उशिराने पोलीस ठाण्यात नेवून त्याला अटक केली होती. त्यावेळी अनेक दिवस तुरुंगात काढल्यानंतर सध्या त्या प्रकरणात तो जामीनावर सुटलेला आहे. त्यावेळी या घटनेवरुन विविध चर्चांसह संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण ढवळले असताना आरोपीच्या मोबाईल तपासणीत त्याचा संबंध माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय्य सहाय्यक भास्कर खेमनर यांच्याशी असल्याचे समोर आल्यानंतर ‘त्या’ प्रकरणाला राजकीय कलाटणीही मिळाली होती.

आजच्या प्रकरणातही आमदार अमोल खताळ सपत्निक अभिषेकासाठी खांडेश्वर मंदिरात येत असल्याची पूर्वमाहिती असल्याप्रमाणे त्याचा वावर दिसून आल्याने पुन्हा एकदा संशय बळावला आहे. खरेतर सदरची घटना घडली त्यावेळी आमदार विश्वस्त मंडळाच्या कार्यालयात उपस्थित होते, तर आरोपी मंदिराच्या परिसरात वावरत होता. पूर्वेतिहास पाहता पोलिसांनी त्याला पाहताच परिसर सोडण्याची सूचना केली, मात्र त्याची उपस्थिती फार गांभीर्याने घेतली नाही. म्हणूनच पोलिसांनी सांगितल्यानंतरही तो विश्वस्त कार्यालयाच्या परिसरातच घिरट्या घालीत असल्याचे पाहुन आमदार खताळ यांच्या काही समर्थकांनी त्याला पकडून चोपायला सुरुवात केली. त्यातून गोंधळ निर्माण झाल्याने पालिसांनी तत्काळ त्या दिशेने धाव घेत संशयीताला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. तूर्त त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

या घटनेने वर्षभरापूर्वीच्या ‘त्या’ प्रसंगाच्या आठवणी जाग्या झाल्या असून आजही तसाच प्रकार घडण्याची शक्यता होती असा खताळ समर्थकांचा दावा आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून गेल्यावर्षीच्या प्रकरणातील आरोपी प्रसाद गुंजाळ याच्याकडून ‘वर्षपूर्ती ऐतिहासिक क्षण सोहळा आनंदोत्सव लवकरच’, ‘लाडका मित्र हिरो कमिंग सून’, ‘मित्रा, सहनशक्ति संपली.. लवकरच भावपूर्ण श्रद्धांजली’, ‘वेळ आली आहे उत्तराची, शब्द नाही, कृती बोलेल!’ अशा प्रकारचे सूचक आशयाचे वक्तव्य समोर येत होते. खरेतर पोलिसांनी त्याचा पूर्वेतिहास, सोशलवरील त्याचे सूचक इशारे, स्थानिक असल्याची जमेची बाजू आणि खांडगाव देवस्थान विश्वस्त मंडळातील सदस्यांची नावे यांचा विचार करुन रविवारीच त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्याची गरज होती. मात्र त्याच्याकडून पुन्हा असेकाही घडेल याबाबत पोलीस पूर्णतः अनभिज्ञ असल्याचे मात्र त्याचवेळी आमदार समर्थक सतर्क असल्याचेही दिसून आले आहे.

गेल्यावर्षीचा पूर्वानुभव लक्षात घेता आज सकाळी आमदार अमोल खताळ खांडेश्वर मंदिरात उपस्थित असताना ‘त्या’ प्रकरणातील संशयीत आरोपी प्रसाद बापूसाहेब गुंजाळ याला परिसरातून बाहेर काढण्यात आले होते. संभाव्य घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आवश्यक बंदोबस्तही तैनात केला होता. सदरचा प्रकार मंदिराच्या बाहेरच्या बाजूला घडला असून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याच्यावर मुंबई पोलीस अधिनियमातंर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून चौकशी नंतर पुढील कारवाईची तजबीज ठेवली आहे.
– समीर बारवकर
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर

