होमिओपॅथिक शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चंदनापुरी घाटातील वृंदावन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होमिओपॅथिक शिबिराला रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. १८७ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. तसेच यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५७ दात्यांनी रक्तदान केले.

महात्मा गांधी जयंती निमित्त डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित वृंदावन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत होमिओपॅथिक तपासणी व औषधोपचार शिबिर तर आधार रक्तपेढी संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरुण जाधव, उपप्राचार्या डॉ. पूनम ढगे, वृंदावन हॉस्पिटलचे सीनियर मेडिकल ऑफिसर डॉ. सुनील मदने, डॉ. सूरज ढगे उपस्थित होते.

१९८३ सालापासून सुरू करण्यात आलेला हा आरोग्यसेवेचा यज्ञ ४३ व्या वर्षीही नियमितपणे सुरू आहे. शिबिरात सहभागी रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून मलेरिया टायफॉईड, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांबरोबरच जुनाट आणि दुर्धर आजारांचे निदान करून औषधोपचार केले. या शिबिराचा १८७ रुग्णांनी लाभ घेतला. तसेच गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात संस्थेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होत ५७ जणांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्था संचलित बी. एस्सी नर्सिंग कॉलेज आणि वृंदावन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विशेष परिश्रम घेतले.

Visits: 205 Today: 4 Total: 1105394
