शेतकर्यांनी लम्पी आजाराला घाबरु नये ः कानवडे नुकसानग्रस्त पशुपालकांना पशुसंवर्धन विभाग करणार मदत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावामुळे ज्या पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे अशा पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे 100 टक्के राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग अर्थसहाय्य देण्याची घोषणा महसूल, दुग्धव्यवसाय विकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे, अशी माहिती भाजप किसान मोर्चा उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.
पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष कानवडे म्हणाले, शासनाकडून मृत झालेल्या पशुधनासाठी शेतकर्यांना अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. दुधाळ जनावरे गाय व म्हैस लम्पी चर्मरोगामुळे दगावले तर तीस हजार रुपये प्रति जनावर एवढी मदत दिली जाणार आहे, ही मदत तीन दुधाळ जनावरांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. म्हणजे एका पशुपालकाचे तीन दुधाळ जनावरे दगावली तर त्या पशुपालकाला तीन मृत जनावरांसाठी 90 हजारांची मदत मिळणार आहे. शेतीकाम करणार्या बैलाचा मृत्यू झाल्यास शेतकर्यांना 25 हजार रुपये प्रति जनावर एवढी मदत दिली जाणार आहे. यामध्ये देखील तीन जनावरांपर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे.
वासरे या आजारामुळे दगावल्यास प्रति वासरू 16 हजार रुपयांची मदत राज्य शासनाकडून केली जाणार आहे. यामध्ये सहा वासरापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे. म्हणजेच एका शेतकर्याचे सहा लहान जनावरे किंवा वासरू दगावल्यास त्यांना 96 हजारांची मदत मिळू शकणार आहे. ज्या शेतकर्यांचे पशुधन लम्पी चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडले आहे, अशा शेतकर्यांनी याबाबतची सूचना तत्काळ किंवा जास्तीत जास्त दुसर्या दिवशी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात, संबंधित पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच ग्रामपंचायतीस द्यावयाची आहे. संबंधित शेतकरी यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यावरील पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक / तलाठी, पोलीस पाटील तसेच दोन स्थानिक नागरिक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पशुधन मृत्यूमुखी पडल्याबाबतचा पंचनामा करून घ्यावयाचा आहे.
सदर पंचनाम्यात पशुधनाचा मृत्यू लम्पी चर्मरोगामुळे झाला असल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. यानंतर तो पंचनामा संबंधित अधिकारी पुढे पाठवतील आणि त्यानंतर शेतकर्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम शेतकर्यांना डीबीटीच्या माध्यमातून मिळणार म्हणजे थेट खात्यात जमा होणार आहे. निश्चितच शासनाचा हा निर्णय पशुपालक शेतकर्यांना दिलासादायक ठरणार आहे.
राज्यात सध्या 75 लाख लसी उपलब्ध असून लम्पी रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे त्यांच्या पिकांचे पंचनामे झाले आहेत, अशा पात्र शेतकर्यांना लवकरच अनुदान बँक खात्यात थेट जमा होणार आहे, अशी माहिती सतीश कानवडे यांनी दिली आहे.