संगमनेरच्या महसूल विभागावर पुन्हा लाचखोरीची संक्रांत! तलाठ्यासाठी लाच घेणारा दलाल रंगेहात; दोघांनाही नाशिक ‘एसीबी’ने घेतले ताब्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या कारणांवरुन सतत चर्चेत असणाऱ्या संगमनेरच्या महसूल विभागातील कुप्रसिद्ध तलाठी 36 हजारांची लाच घेताना धरला गेला आहे. नाशिकच्या एसीबी पथकाने केलेल्या या कारवाईत तलाठ्याच्यावतीने लाच स्वीकारणाऱ्या खासगी दलालाला रंगेहात चतुर्भुज केल्यानंतर एसीबीने ‘त्या’ तलाठ्यालाही ताब्यात घेतले आहे. या घटनेतून तहसीलदारांशिवाय असलेल्या संगमनेर तालुक्यात बोकाळलेली लाचखोरी आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. 
याबाबत नाशिक एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मंगळापुर शिवारात बिगर शेतीक्षेत्र असलेल्या तक्रारदाराने आपल्या वडिलांसह अन्य अकरा जणांच्या नावावर असलेल्या या जमिनीचे स्वतंत्र सातबारा उतारे नोंदविण्यासाठी चिखली सजाचे कामगार तलाठी धनराज नरसिंग राठोड (वय 40 वर्ष, इंदिरा नगर, गल्ली नं.1) याच्याशी संपर्क साधला होता. सदरचे काम करुन देण्याच्या मोबदल्यात लाचखोर तलाठी राठोड याने तक्रारदाराकडून चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती आजरोजी 36 हजार रुपये देण्यावर त्यांच्यात एकमत झाले होते.
तत्पूर्वीच तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार नाशिक एसीबीच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक अजय गरुड व चालक विनोद पवार यांनी संगमनेरात येवून तक्रारदारास लाचखोर तलाठी राठोड याच्याशी संपर्क साधण्यात सांगितला. यावेळी संबंधित लाचखोराने लाचेची रक्कम घुलेवाडी येथील सह्याद्री मल्टी सर्विसेसचा चालक व तलाठी राठोड याचा खासगी दलाल योगेश विठ्ठल काशीद (वय 33, रा.घुलेवाडी फाटा) याच्याकडे रक्कम देण्यास सांगितले.
त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून ठरल्याप्रमाणे तक्रारदाराच्या हातात विशिष्ट पावडर लावलेल्या नोटा दिल्या व त्यांना संबंधित दलाकडे पाठवले. सदरील लाचेची रक्कम स्वीकारीत असताना आसपास वेशांतर करुन दबा धरुन बसलेल्या पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता झडप घालीत या दलालाला रंगेहात चतुर्भुज केले. सदरील रक्कम आपण तलाठी धनराज राठोड याच्यासाठी घेतल्याची कबुलीही त्याने दिली. त्याला ताब्यात घेऊन शासकीय विश्रामगृहावर आणण्यात आले, त्यानंतर काही वेळातच संगमनेर पोलिसांच्या मदतीने लाचखोर तलाठी धनराज राठोड याच्याही मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांवरही संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने संगमनेरच्या महसूल विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी चव्हाट्यावर आली असून या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *