भारत भोसलेसह दोघांना अखेर शहर पोलिसांकडून अटक! माजी जि.प.सदस्याला मारहाण व बदनामी प्रकरणी संगमनेर पोलिसांची कारवाई


नायक वृत्तसेवा, संगमनेर
घुलेवाडी गटातील जिल्हा परिषदचे माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते सीताराम राऊत यांना भररस्त्यात अडवून दोघा महिलांनी त्यांना मारहाण केली तर दोघांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करुन केलेल्या बदनामीबाबत दाखल गुन्ह्यात पोलीस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणात शहर पोलिसांनी कथीत सामाजिक कार्यकर्ते भारत संभाजी भोसले याच्यासह अन्य एकाला आज अटक केली असून दुपारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणात एकूण चौघांवर गुन्हा दाखल आहे, तर माजीमंत्री धनंजर मुंडे यांच्या पत्नी करुणा यांनी केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीतही भोसलेसह आज अटक केलेल्या दुसर्‍या आरोपीचा समावेश आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार सदरची घटना गेल्या सोमवारी (ता.19) घुलेवाडी शिवारात घडली होती. पूर्ववादाची पार्श्वभूमी असलेल्या या प्रकरणात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले सीताराम राऊत आपल्या चारचाकी वाहनातून जात असतांना दोघा महिलांनी आपली मोपेड आडवी घालून त्यांना थांबवण्यास भाग पाडले. यावेळी त्या दोघांनाही महिलांनी भररस्त्यातच त्यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करीत त्यांना वाहनाबाहेर काढले व त्यानंतर त्यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना मारहाणही केली होती. हा प्रकार सुरु असताना सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापराव उर्फ बाबा ओहोळ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या महिलांसह अन्य दोघांनी त्यांना या प्रकरणात लक्ष न देण्याची सूचना करीत राऊत यांना शिवीगाळ व मारहाण सुरुच ठेवली.

हा प्रकार घडत असताना भारत संभाजी भोसले आणि प्रथमेश संतोष अभंग हे दोघेही आपल्या मोबाईलद्वारे या घटनेचे चित्रीकरण करीत होते. जवळपास अर्धातास सुरु असलेल्या या प्रकारात घुलेवाडीतील अनेकांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा थांबला. यानंतर सीताराम राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात जावून सदर प्रकाराबाबत विद्या संतोष अभंग, कविता संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (तिघेही रा. घुलेवाडी) यांच्यासह भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती, कोंची) या चौघांवर भा. दं. वि. कलम 327, 337, 341, 323, 500 ख 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून वरील चारही आरोपी पसार झाले होते. मात्र आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांना भारत संभाजी भोसले व प्रथमेश संतोष अभंग या दोघांचाही सुगावा लागताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.

भारत संभाजी भोसले व विद्या अभंग हे दोघेही माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसर्‍या पत्नी करुणा मुंडे यांच्या संपर्कात होते. मुंडे यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली होती व त्यासाठी संगमनेरात पत्रकार परिषद घेवून लवकरच राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याचेही करुणा मुंडे यांनी सांगितले होते, त्यावेळी हे दोघेही त्यांच्यासोबत होते. त्यानंतर काही दिवसांनी मुंडे यांनी भारत भोसले, विद्या अभंग व त्यांचा मुलगा प्रथमेश या तिघांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याची तक्रारही दाखल केली होती, तर या दोघांनीही करुणा मुंडेंवर फसवणुकीचा आरोप ठेवून रोख रक्कम व सोने अशी 40 लाखांची फसवणूक झाल्याची त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरुन भोसले आणि अभंग हे चर्चेत आले होते.

Visits: 186 Today: 1 Total: 1418188

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *