अवघ्या चारच दिवसांत पडली सव्वाशे रुग्णांची भर! नोव्हेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात वाढलेली रुग्णगती आजही कायमच

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळी खरेदीचा दुष्परिणाम म्हणून 16 नोव्हेंबरपासून संगमनेर तालुक्यातील कोविड रुग्णवाढीला आलेला वेग डिसेंबरच्या पहिल्या आठ दिवसांतही कायम असल्याचे दिसून येत आहे. अर्थात या आठवड्यात आलेल्या आलेल्या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे सरासरीत किंचित घट झाली असली तरीही ती कृत्रिम घट असल्याने नोव्हेंबरचा सिलसिला डिसेंबरमध्येही कायम असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसांत तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल 36.25 रुग्णगतीने तब्बल 290 रुग्ण समोर आले असून त्यातील 128 रुग्ण गेल्या चारच दिवसांत आढळून आले आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांतील अहवालातून शहरी रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागल्याने काहीसे समाधानाचेही वातावरण आहे. तालुक्यातील रुग्णवाढीची सरासरी अव्याहत असल्याने तालुका आता साडेपाच हजार रुग्णसंख्येच्या उंबरठ्यावर 5 हजार 488 वर जावून पोहोचला आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तालुक्याची सरासरी रुग्णगती 22 रुग्ण प्रति दिवस तर दुसर्‍या पंधरवड्यात 38 रुग्ण प्रति दिवस अशी होती. गेल्या संपूर्ण महिन्यात 30.33 रुग्णगतीने तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 910 रुग्णांची भर पडली होती. नोव्हेंबरचा वेग कायम राखतांना डिसेंबरने सुरुवातीपासून रुग्णवाढीचा सिलसिला कायम राखल्याने चालू महिन्यात तालुक्यातील बाधितांची संख्या विक्रमी संख्येवर जाते की काय अशीही स्थिती निर्माण झाली असून गेल्या आठच दिवसांत तालुक्याच्या रुग्णसंख्येत सरासरी 36.25 च्या गतीने तब्बल 290 रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या महिन्यात 11 रुग्णांवर गेलेली शहरी रुग्णगती या आठ दिवसांत मात्र खालावली असून सध्या सरासरी 8.37 रुग्णगतीने बाधित समोर येत आहेत. तर ग्रामीण रुग्णवाढीचा वाढलेला टक्का आजही कायम असून ग्रामीण क्षेत्रातून 28 रुग्ण दररोज समोर आहेत. गेल्या आठ दिवसांत शहरात 68 तर ग्रामीण भागात 222 रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या आठ दिवसांचा विचार करता 1 डिसेंबर रोजी एकूण 49 (शहर 12 व ग्रामीण 37) रुग्ण, 2 डिसेंबररोजी 34 (शहर 13 व ग्रामीण 21) रुग्ण, 3 डिसेंबररोजी 45 (शहर 9 व ग्रामीण 36) रुग्ण, 4 डिसेंबररोजी 34 (शहर 8 व ग्रामीण 26) रुग्ण, 5 डिसेंबररोजी 40 (शहर 8 व ग्रामीण 32) रुग्ण, 6 डिसेंबररोजी 10 (शहर 3 व ग्रामीण 7) रुग्ण, 7 डिसेंबररोजी 30 (शहर 7 व ग्रामीण 23) रुग्ण आणि 8 डिसेंबर रोजी एकूण 48 रुग्ण (शहर 8 व ग्रामीण 40) रुग्ण अशा एकूण शहरी 68 व ग्रामीण 222 रुग्णांसह एकूण 290 रुग्ण (सरासरी 36.25) आढळून आले आहेत. गेल्या महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात हिच सरासरी 38.27 होती. त्यात आजही सातत्य असल्याचे गेल्या आठ दिवसांतील आकडेवारीतून समोर आले आहे.

मंगळवारी (ता.8) या महिन्यातील दुसरी उच्चांकी रुग्णसंख्या नोंदविली गेली असून शहरातील सात जणांसह एकूण 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात शहरातील साळीवाडा भागातील 46 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, एका शासकीय बँकेतील 56, 54 व 50 वर्षीय इसमांसह 35 वर्षीय महिला, नवीन नगर रस्त्यावरील 60 वर्षीय महिला व गुलमोहर वसाहतीमधील 59 वर्षीय इसमाला कोविडचे संक्रमण झाले आहे. त्यासोबतच ग्रामीणभागातील सारोळे पठार येथील 36 वर्षीय तरुण, आश्वी बु. येथील 58 वर्षीय दोघांसह 50 वर्षीय इसम, 17 वर्षीय तरुण व 40 वर्षीय महिला, सांगवी येथील 46 वर्षीय इसम, रायते येथील 35, 21 व 18 वर्षीय तरुण, 45 व 35 वर्षीय महिला, गुंजाळवाडी शिवारातील विठ्ठलनगर येथील 48 वर्षीय इसम व गुंजाळवाडीतील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कौठे खुर्दमधील 50 व 35 वर्षीय महिलांसह 22 वर्षीय तरुण, राजापूरमधील 29 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. मधील 40, 18 व 17 वर्षीय तरुणांसह 34 वर्षीय महिला.

निमगाव जाळी येथील 22 वर्षीय तरुण, नान्नज दुमाला येथील 53 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 68 व 53 वर्षीय इसमांसह 37 व 21 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 54 वर्षीय इसम, पिंपरणे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कौठे कमळेश्वर येथील 52 वर्षीय महिला, अंभोरे येथील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 63 वर्षीय महिला, मनोली येथील 42 वर्षीय तरुण, निमगाव भोजापूर येथील 28 वर्षीय तरुण, निमगाव पागा येथील 55 वर्षीय इसम, धांदरफळ खुर्द येथील 69 वर्षीय महिला, नांदूर खंदरमाळ येथील 83 वर्षीय वयोवृद्ध व कासारा दुमाला येथील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अशा एकूण 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 5 हजार 488 वर पोहोचली आहे.

ऑक्टोबर महिन्यात शहरी रुग्णगतीला ब्रेक लागल्याचे दिसले होते. मात्र दिवाळीनंतरच्या रुग्णवाढीत ग्रामीण क्षेत्रासह शहरी रुग्णगतीही उंचावल्याने काहीशा चिंता निर्माण झाल्या होत्या. मात्र या महिन्यातील पहिल्या आठ दिवसांत शहरी रुग्णवाढीला काही प्रमाणात ब्रेक बसल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याचवेळी ग्रामीण भागातील रुग्णवाढीचा सिलसिला आजही कायम असून गेल्या महिन्यातील दुसर्‍या पंधरवड्याप्रमाणेच रुग्णवाढीची सरासरी टिकून असल्याने संगमनेरकरांच्या चिंता आजही कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *