मार्क्सवादी पक्षाचे अकोल्यात जोरदार शक्तिप्रदर्शन! आंदोलकांच्या मागण्या मान्य; क्रांती दिनापासून सुरु असलेले आंदोलन स्थगित..


नायक वृत्तसेवा, अकोले
शेतकरी, कामगार, कर्मचारी व आदिवासी समुदायाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आज अकोले शहरात मोर्चा काढण्यात आला. लॉकडाउनच्या काळात प्रलंबित असलेल्या श्रमिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सिटू कामगार संघटनांच्यावतीने क्रांती दिनापासून (9 ऑगस्ट) अकोले तहसील कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह सुरु करण्यात आला होता. आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी माकपने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. आजच्या आंदोलनात शेतकरी, आदिवासी व श्रमिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


9 ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरू असणार्‍या सत्याग्रहामध्ये आदिवासी वाड्या-पाड्यांचे रस्ते, वीज, पाणी या मूलभूत प्रश्नांना सोडविण्यासाठी मागण्या घेण्यात आल्या होत्या. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉ.किरण लहामटे यांनी या संदर्भात अधिकार्‍यांसमवेत 10 ऑगस्टरोजी बैठकही घेतली. पिंपळगाव खांड येथील ठाकर वाडीला रस्ता व वीज, तसेच फोफसंडी येथील आदिवासी वस्तीसाठी फोफसंडी ते कोंबड किल्ला रस्ता व कोंबड किल्ला पायथ्याशी असणार्‍या मुठेवाडीला विजेची व्यवस्था, खडकी येथील आदिवासी वाडीला वीज आर्दी प्रश्न आदिवासी विकास निधी व आमदार निधीतून मार्गी लावण्याबाबत ठोस आश्‍वासन त्यांनी या बैठकीत दिले. या कामासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व परवानग्या तातडीने उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात आली व याबाबतचे सर्व प्रस्ताव आंदोलकांच्या समक्ष संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आले.


आज (ता.11) प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सुरू असणार्‍या प्रयत्नांचा आढावा घेतला. आंदोलक, वनविभाग तसेच महसूल विभागाचे प्रमुर्ख अधिकारी आजच्या बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी किसान सभेच्या वतीने संगमनेर तालुक्यातील अनेक प्रश्न उपस्थितीत करण्यात आले, प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलकांनी समाधान व्यक्त केले. तालुक्यातील सर्व श्रमिकांना घरकुले, घरकुल ‘ड’ यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू करणे, बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करणे, घरेलू कामगारांची नोंदणी तातडीने सुरू करणे, घरेलू कामगारांना कोविड काळातील अनुदान देणे, आशा कर्मचार्‍यांना रुग्णालयात मुक्कामाची स्वतंत्र व्यवस्था करणे, आशा कर्मचारी व अर्धवेळ परिचारिकांचे थकित मानधन तातडीने वर्ग करणे व आशा गटप्रवर्तकांचे विविध प्रश्न तातडीने सोडवणे, अंगणवाडी कर्मचार्‍यांना वेतनवाढ द्या, अतिरिक्त कामाचा बोजा कमी करून अंगणवाडी कर्मचार्‍यांचे विविध प्रश्न सोडवा, अशा विविध मागण्या यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या.


संबंधित विभागाने आंदोलकांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले. याप्रसंगी निघालेला मोर्चा वसंत मार्केट या ठिकाणावरून सुरू झाला. शहरांमध्ये श्रमिक एकजुटीच्या जोरदार घोषणा देत माकपने या वेळी जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले. तहसील कार्यालयावर मोर्चाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर 35 रुपये दर द्या व दूध क्षेत्राला एफ.आर.पी. चे संरक्षण लागू करा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला यावेळी जाहीर पाठिंबा देण्यात आला. आंदोलकांनी मांडलेल्या बहुतांशी मागण्या मान्य झाल्यामुळे 9 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेले आंदोलन यावेळी स्थगित करण्यात आले. आंदोलनातील मागण्या मान्य झाल्याने शेतकरी व श्रमिकांनी जोरदार जल्लोष करत आंदोलनाची सांगता केली. डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, जुबेदा मणियार, आराधना बोराडे, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे, भारती गायकवाड, आशा घोलप, गणेश ताजणे, नंदू गवांदे, संदीप शिंदे, अविनाश धुमाळ, सविता काळे, राजाराम गंभीरे, प्रकाश साबळे, गणपत मधे, शिवराम लहामटे, किसन मधे, निवृत्ती डोके आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.


गेल्या 9 ऑगस्टपासून श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी अकोल्यात उपोषण सुरु करण्यात आले होते. मात्र आज सकाळी संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी अकोले येथे आंदोलकांशी चर्चा करीत बहुतांशी मागण्या मान्य केल्याने त्यांच्या विनंतीवरुन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीसह अन्य कामगार संघटनांनी आपले आंदोलन मागे घेतले. तर कोविड काळात रुग्णांकडून घेतलेले वाढीव शुल्क रुग्णालयांनी परत करावे यासाठी तेथील सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. डॉ.मंगरुळे यांनी त्यांच्यासोबतही अशाच पद्धतीने चर्चा करुन त्यावर तोडगा काढल्याने त्यांनीही आपले आत्मदहन स्थगित केले आहे. डॉ.मंगरुळे यांच्या शिष्टाईतून क्रांतीदिनी सुरु झालेल्या आंदोलनासह स्वातंत्र्यदिनी होणार्‍या संभाव्य आत्मदहनाचा विषयही संपल्याने संगमनेर-अकोल्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Visits: 25 Today: 1 Total: 119371

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *