आषाढी एकादशीसह बकरी ईद एकोप्याने साजरे करा ः भोर नेवाशात शांतता समितीच्या बैठकीत सर्वधर्मीयांचा सहभाग
नायक वृत्तसेवा, नेवासा
बकरी ईद व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलीस ठाण्याने आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय व सर्वधर्मीय बांधवांनी सहभाग नोंदविला. आषाढी एकादशी व बकरी ईद उत्सव एकोप्याने साजरा करून जातीय सलोखा वृद्धिंगत करा, असे आवाहन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर यांनी केले.
नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या शांतता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर होत्या. पोलीस निरीक्षक विजय करे, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कोलते, कृषीतज्ज्ञ डॉ. अशोक ढगे, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, लक्ष्मण जगताप, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, जनसेवक राजेंद्र मापारी, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुधीर चव्हाण, शिवा राजगिरे आदी उपस्थित होते.
आषाढी एकादशी व बकरी ईद ह्या तिथीनुसार एकाच दिवशी हातात हात घालून आल्या आहेत, त्याचप्रमाणे आपणही जातीय सलोखा वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करावे. कोणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या. कायदा -सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन्ही उत्सव उत्साहपूर्ण व शांततेच्या वातावरणात साजरा करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर यांनी करुन खाकी हीच आमची जात व धर्म असल्याने कायदा-सुव्यवस्थेत बाधा आणणार्यांची गय केली जाणार नाही त्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी बकरी ईद व आषाढी एकादशी शांततेत साजरी करावी असे आवाहन करुन उपस्थितांचे आभार मानले.