तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही पडली एकोणावीस रुग्णांची भर!

नायक वृत्तसेवा, संगमनेर

संगमनेर तालुक्यात कोविड बाधितांच्या संख्येत दररोज भर पडण्याची श्रृंखला आजही कायम असून मंगळवारी पंचवीस रुग्णांची भर पडल्यानंतर आज पुन्हा एकदा संगमनेरकरांना धक्का बसला आहे. प्रशासनाच्यावतीने आजही करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीसह खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून संगमनेर तालुक्यातील बाधितांच्या संख्येत आजही एकोणावीस रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत सलग वाढ होत आज बाधितांचा आकडा 1 हजार 272 वर पोहोचला आहे.

     गेल्या दिड महिन्यापासून संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दररोजच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे. अर्थात स्थानिक प्रशासनाने तात्काळ निष्कर्ष देणार्‍या रॅपिड अँटीजेन चाचणीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करुन चाचण्याची संख्या आणि गतीही वाढवल्याने तालुक्यातील रुग्ण निष्पन्न होत असल्याचेही वास्तव चित्र आहे. गेल्या काही दिवसांत जिह्यातील शासकीय प्रयोगशाळेकडून केल्या जाणार्‍या चाचण्यांचा वेग वाढला असला तरीही संगमनेरच्या प्रशासनाने अँटीजेन चाचण्यांना प्राधान्य दिल्याने जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविल्या जाणार्‍या स्त्रावांची संख्या घटली आहे. असे असले तरीही संगमनेर तालुक्यातील चाचण्यांची संख्या मात्र पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक पटीने वाढली आहे हे विशेष, त्यामुळे तालुक्यातील रुग्ण दररोज समोर येत असून त्यांच्यावर तात्काळ उपचारही होत आहेत.

     आजही खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे केलेल्या तपासणीतून तालुक्यातील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील साळीवाडा परिसरातील 56 वर्षीय महिला, तर तालुक्यातील प्रतापपूर येथे पहिल्यांदाच रुग्ण सापडले असून तेथील 54 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुणाला संक्रमण झाले आहे. त्यासोबतच बोट्यातून 57 वर्षीय इसम, कऱ्हे येथून 62 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथून 19 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथून 42 वर्षीय तरुण, तर म्हसवंडी येथून 57 वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे.

यासोबतच आज खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातूनही शहर व तालुक्यातील अकरा जण बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यात शहरातील कुरण रोड परिसरातील 73 वर्षीय इसम, रंगारगल्ली परिसरातील 24 वर्षीय महिला, तर नगरपालिकेच्या मागील बाजूस असलेल्या काठे मळा परिसरातील 49 वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव आला आहे.

खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून तालुक्यातील नान्नज दुमाला येथील 50 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 33 वर्षीय तरुण, निमगाव बुद्रुक येथील 29 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 51 वर्षीय इसम, मंगळापुर येथील 82 वर्षीय महिला, बोटा येथील 45 वर्षीय तरुण, रायतेवाडी येथील 54 वर्षीय इसम, तर संगमनेर खुर्द मधून चौरेचाळीस वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. संगमनेर तालुक्याच्या बाधित संख्येत आजही एकोणावीस रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या 1 हजार 272 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील 536 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज..

संगमनेरसह जिल्ह्यातील रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असली तरीही त्यापेक्षा कितीतरी अधिक संख्येने जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांमधून बाधित रुग्णांवरील यशस्वी उपचारानंतर त्यांना घरी सोडण्याचा आलेखही उंचावत आहे. आजही जिल्ह्यातील 536 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले. यात संगमनेरातील 38 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 11 हजार 661 रुग्णांनी उपचार पूर्ण करुन घर गाठले आहे ही सर्वात समाधानकारक बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *