बोटा ग्रामस्थांचा नववर्षानिमित्त सामूहिक स्वच्छतेचा संकल्प तरुणांचा पुढाकार; दशक्रिया विधी घाटासह कचेश्वर मंदिर परिसर चकाकला


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा येथील तरुण व ग्रामस्थांनी नववर्षाचा संकल्प केला आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणांची आठवड्यातून एकदा स्वच्छता करण्याचा संकल्प केला असून, नववर्षाच्या दुसर्‍या दिवशीच याचा श्रीगणेशा केला आहे. याबद्दल गावकर्‍यांनी तरुणांचे कौतुक केले आहे.

नववर्षानिमित्त मोठ्या माणसांपासून लहान मुलांपर्यंत संकल्प करतात. संकल्प वाईट गोष्टी दूर करण्यासाठी आणि नवीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करतात. म्हणूनच, बोटा येथील तरुणांच्या पुढाकारातून ग्रामस्थांनी सामूहिक स्वच्छतेचा नवसंकल्प केला आहे. गावातील दशक्रिया विधी घाट, कचेश्वर मंदिर परिसर, ग्रामपंचायत परिसर आदी सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार नववर्षाच्या दुसर्‍या दिवशी संकल्पाचा श्रीगणेशा केला. या परिसराची स्वच्छता करुन कचर्‍याची विल्हेवाट लावली. यामुळे परिसरही चकाकू लागला. संकल्प केल्यानुसार ही स्वच्छता मोहीम आठवड्यातून एकदा राबविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

या स्वच्छता मोहिमेत माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेळके, सुनील कणसे, संदीप दावल शेळके, अस्लम शेख, रवींद्र शेळके, शिवाजी शेळके आदिंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. या नवोपक्रमाबद्दल तरुणांचे गावकर्‍यांनी कौतुक केले आहे. याप्रमाणेच इतर गावांनी देखील अनुकरण केले तर नक्कीच संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर होवून गावे स्वच्छ होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *