साई संस्थानच्या नव्या विश्वस्तांची यादी बुधवारी जाहीर होणार इच्छुकांची धाकधूक वाढली; तर जिल्हावासियांचे निवडींकडे लागले लक्ष

नायक वृत्तसेवा, शिर्डी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी सरकारने मागितलेली दोन आठवड्यांची मुदत 5 जुलै रोजी संपत असल्याने नवीन विश्वस्तांची यादी आज न्यायालयात सादर होणार होती. परंतु, सरकार आता ही यादी 7 जुलैला सादर करणार आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे यांनी दिली आहे.

साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर उच्च न्यायालयाने शासनास अजून दोन आठवडे मुदतवाढ दिली होती. त्याची सुनावणी 22 जून रोजी ठेवण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयात यादिवशी क्राईम बोर्ड असल्याने सुनावणीची तारीख बुधवार दि.23 रोजी ठेवली होती. त्यानंतर आज याबाबत सुनावणी होणार होती. परंतु, आता ती दोन दिवस लांबणीवर पडली आहे.

या नव्या विश्वस्त मंडळाच्या यादीवर आक्षेप घेण्याची शक्यता गृहीत धरून सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. यासंदर्भात कायदेतज्ज्ञ आणि अन्य तज्ज्ञांशी सल्लामसलत केली जात आहे. त्यातून मार्ग करण्याचे प्रयत्न होत आहेत. यादरम्यान साई संस्थान अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त निवडीसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र उच्च न्यायालयात सरकारी पक्षाच्या वकिलांनी अजून दोन आठवड्यांची मुदतवाढ घेतल्याने विश्वस्त पदासाठीची चुरस वाढली आहे. त्यानुसार आता ही यादी 7 जुलैला न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या विश्वस्तांच्या यादीकडे सर्वांच्या नजरा आहेत.

इच्छुकांची धाकधूक वाढली…
देशात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या याद्या 23 जूनच्या रात्री सोशल मीडियावर झळकत होत्या. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील अनेक संभाव्य नावे होती. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्यावतीने निवड झालेल्या या संभाव्य सदस्यांवर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला. काहींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. यातील काही तथाकथित विश्वस्तांनी सत्कारही घेतले. तसेच सोशल मीडियावर अनेकांच्या अभिनंदनाच्या पोस्ट फोटोंसह झळकत होत्या. आता या यादीतील कोणत्या नेत्याला साईबाबा पावणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *