छत्रपतींच्या स्मारकासाठी सोडली अवघी तीन फूट जागा! युवा नेते सत्यजीत तांबे यांच्या शिष्टाईनंतरही शिवप्रेमींचा हिरमोडच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सन 1979 साली अरगडे गल्लीच्या मारुती मंदिरासमोर निर्माण करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथील छत्रपतींच्या अर्धाकृती प्रतिमेच्या जागी विस्तारीत जागेत अश्वारुढ प्रतिमा उभारावी अशी संगमनेरातील हिंदुत्त्ववाद्यांची मागणी आहे. त्यासाठी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जागेच्या मूळमालकांशी शिष्टाई केली होती. मात्र त्याचे फळ संबंधितांनी केवळ तीन फूट जागा सोडण्यात झाल्याने बजरंग दलाने संताप व्यक्त करीत नगरपालिकेला निवेदन देत सदरील बांधकाम बंद पाडले आहे. विशेष म्हणजे सदर जागेच्या मालकाच्या नावावर पालिकेची सुमारे 40 लाखांपेक्षा अधिक रुपयांची थकबाकी असतांनाही त्यांना बांधकाम परवाना कसा देण्यात आला असा सवालही या निवेदनातून विचारण्यात आला आला आहे. मूळमालकाच्या या भूमिकेने शहरातील शिवपप्रेमींचा मात्र हिरमोड झाला आहे.

संगमनेर शहराची ओळख असलेले अरगडे गल्लीतील शिवस्मारक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुमारे चार दशकांपूर्वी एन.के.गाडे यांच्या जागेत संगमनेर नगरपालिकेने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची अर्धाकृती प्रतिमा स्थापन केली होती, तेव्हापासून हे स्मारक संगमनेरची ओळख सांगत आहे. या स्मारकाचे सुशोभिकरण व्हावे, अर्धाकृती प्रतिमेऐवजी तेथे शिवरायांची अश्वारुढ प्रतिमा तेथे स्थापण्यात यावी अशी असंख्य संगमनेरकरांची गेल्या अनेक वर्षांची अपेक्षा आहे. या जागेत पूर्वी नोव्हेल्टी लॉज होते, ते पाडण्यात येवून जागा मालकाकडून या जागेत बांधकामाची चाचपणी सुरु झाल्यानंतर गेल्या मार्चमध्ये हिंदुत्त्ववाद्यांसह शिवप्रेमींच्या आशा पुन्हा जागल्या आणि येथील शिवस्मारकाचे विस्तारीकरण करण्याची मागणी जोर धरु लागली.

असंख्य नागरिकांची मागणी असल्याचे पाहून युवानेते, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी त्यासाठी गेल्या 1 एप्रिल रोजी जागा मालक योगेश गाडे यांची भेट घेवून संगमनेरकरांची मागणी त्यांच्या निदर्शनास आणून दिली व शिवस्मारकासाठी वाढीव जागा सोडण्याची विनंती केली. त्यावेळी झालेल्या चर्चेत जागा मालकाने नेमकी किती जागा सोडणार असल्याचे सांगितले याबाबत कोणतीही स्पष्टता नाही, मात्र त्यावेळी तांबेंसोबत असलेले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखील पापडेजा यांनी फेसबुकवर भली मोठी पोस्ट लिहून गाडे कुटुंबाच्या ‘दातृत्त्वा’चे गोडवे गायले होते व या बैठकीचे छायाचित्रही प्रसारित करण्यात आले होते. त्यावरुन अनेकांनी आता येथे शिवरायांच्या प्रतिष्ठेला साजेशे स्मारक होईल अशी मनोमन प्रतिमा तयार केली होती. मात्र ती आता सपशेल फोल ठरली आहे.

सदरच्या जागा मालकाने या जागेत प्रत्यक्ष बांधकाम सुरु केले असून सत्यजीत तांबे यांच्या शब्दाचा सन्मान करतांना केवळ तीन फुटाच्या आसपास जागा सोडली आहे. तांत्रिक दृष्टीने पाहिल्यास इतक्या जागेत सध्या असलेल्या स्मारकाचे कोणत्याही प्रकारे सुशोभिकरण होवू शकत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर संगमनेरातील शिवप्रेमींसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. याबाबत बजरंग दलाने पालिकेला निवेदनही सादर केले असून त्यात वरीलप्रमाणे गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे.

यासोबतच सदरचे संपूर्ण बांधकामच बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोपही या निवेदनातून करण्यात आला असून एन. के. गाडे यांच्याकडे 2012 सालची 9 लाख 42 हजार 515 रुपयांची थकबाकी असताना व आजच्या स्थितीत व्याजासह ती थकबाकी 40 ते 45 लाख रुपये झालेली असतानाही व सदर बांधकामातून पुणे-नाशिक महामार्गाचे नियम पायदळी तुडविले जावूनही त्यांना परवानगी कशी देण्यात आली अशी विचारणाही या निवेदनातून करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या मागणीनंतर पालिकेने सदरचे बांधकाम बंद पाडले आहे.

सामान्य माणसांचे हजार रुपयांसाठी नळ कनेक्शन तोडणारी नगरपालिका इतकी मोठी रक्कम थकविणार्‍या ठेकेदाराला का पाठिशी घालीत आहे? असा सवाल करुन येथील शिवस्मारकासाठी कमीतकमी 15 फूट जागा सोडण्यात यावी व त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अश्वारुढ प्रतिमा स्थापन करावी. अन्यथा त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *