धरणांच्या पाणलोटाला अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा! उत्तरेतील धरणांमध्ये महिन्याभरात अडीच टीएमसी पाण्याची आवक

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्यात मान्सूनचे आगमन होवून महिन्याचा कालावधी लोटत आला असला तरीही जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्राला मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोटात मान्सून दाखल झाला आहे, परंतु अजूनपर्यंत त्याला जोर नसल्याने धरणांमध्ये संथगतीने पाण्याची आवक सुरू आहे. आत्तापर्यंत मुळा खोर्‍यातील आंबित व पिंपळगाव खांड हे दोनच लघु प्रकल्प भरले असून उर्वरीत जलसाठ्यांना पावसाची आवश्यकता आहे. मागील चोवीस तासांत भंडारदर्‍याच्या पाणलोटातील रतनवाडीत सर्वाधिक अवघ्या 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

यंदाच्या वर्षी आलेल्या विविध वादळांनी मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चितता निर्माण केली होती. मात्र सगळे अंदाज फोल ठरवतांना चक्क वेळेपूर्वीच मान्सूनने राज्यात पाय ठेवल्याने सर्वत्र चैतन्य दाटले होते. मात्र नंतरच्या काळात मान्सूनचा प्रवास थंडावल्याने कोकण किनारपट्टींचा भाग वगळता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाने दीर्घ ओढ दिली. गेल्या चार दिवसांपासून परतलेल्या मान्सूनने धरणांच्या लाभक्षेत्रात बहुतेक ठिकाणी हजेरी लावतांना समाधानाचे वातावरण निर्माण केले खरे, मात्र त्याचवेळी पाणलोटाला मात्र पाठ दाखवल्याने एका डोळ्यात हसू तर दुसर्‍या डोळ्यात अश्रू अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे. अर्थात पाणलोटात सर्वदूर मान्सून दाखल झाला आहे, मात्र महिना उलटत आला तरीही त्याला अपेक्षित जोर नसल्याने पाणलोटातील आदिवासींच्या चिंता वाढल्या आहेत.

गेल्या चोवीस तासांत उत्तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, लोणी व श्रीरामपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्याचवेळी पाणलोटातही तुरळक सरी कोसळल्याची आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या घाटघरमध्ये गेल्या चोवीस तासांत अवघा 9 मिलीमीटर तर रतनवाडीत 31 मिलीमीटर पाऊस झाला आहे. याशिवाय पांजर्‍यात 10 तर भंडारदर्‍यात 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कळसूबाईच्या शिखरांवरही मान्सूनने काहीकाळ मुक्काम ठोकल्याने निळवंड्यातील पाणीसाठ्यात 70 द.ल.घ.फूट पाणी दाखल झाले आहे, अर्थात त्यातील निम्मे पाणी भंडारदर्‍यातून सोडण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून संगमनेर तालुक्यातही सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाची लगबग वाढली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत 189 मिलीमीटर पाऊस झाला असून रविवारी सर्वाधीक 52 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील संगमनेर 04 मिलीमीटर, लोणी 01 मिलीमीटर व श्रीरामपूर 06 मिलीमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली. मुळा खोर्‍यातील हरिश्चंद्रगडाच्या परिसरात रिमझीम पाऊस सुरु असून मुळा खोर्‍यातील आंबित पाठोपाठ पिंपळगाव खांड प्रकल्पही भरल्याने मुळा नदी वाहती झाली आहे. त्यामुळे या हंगामात पहिल्यांदाच मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरु झाली आहे. गेल्या चोवीस तासांत मुळा धरणाच्या जलसाठ्यात 123 द.ल.घ.फूट पाणी दाखल झाले आहे.

सध्या भंडारदरा धरणाच्या विद्युतगृहातून निळवंड्यात 840 क्यूसेकने पाणी सोडले जात असून निळवंड्यातून 800 क्यूसेकने प्रवरा नदीपात्रात आर्वतनाचे पाणी सुरु आहे. तर मुळा खोर्‍यातील पावसाचे मोजमाप होणार्‍या कोतुळ नजीकच्या मुळापात्रातून सध्या 795 क्युसेक पाणी वाहत आहे. आज सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात 31 द.ल.घ.फूट पाण्याची आवक होवून जलसाठा 5 हजार 183 द.ल.घ.फूट (46.95 टक्के), निळवंडे धरणात 70 द.ल.घ.फूट पाण्याची आवक होवून जलसाठा 1 हजार 26 द.ल.घ.फूट (12.45 टक्के) तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणात 123 द.ल.घ.फूट पाण्याची आवक होवून जलसाठा 8 हजार 878 द.ल.घ.फूट झाला आहे. आढळा (देवठाण) धरणात सध्या 463 द.ल.घ.फूट (43.68 टक्के) तर भोजापूर जलाशयात 48 द.ल.घ.फूट (13.30 टक्के) पाणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *