शिर्डीत बांधकाम मजुरावर धारदार शस्त्राने वार

नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईनगरीत बांधकाम मजुरावर चार अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, शिर्डी पोलिसांनी गंभीरतेने दखल घेतली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राजू अंतवन धिवर (वय 42, रा.कालिकानगर, शिर्डी) येथील रहिवासी असून सेंट्रींगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याचे कोणाशीही वाद नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मंगळवारी नेहमीप्रमाणे आपले कामकाज उरकून संजय नामक जोडीदारासोबत घरी पायी येत असताना नगर-मनमाड महामार्गावरील साकुरी शीवजवळ अज्ञात चौघांनी माचिस मागण्याचा बहाणा करत धारदार शस्राने हल्ला चढवला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी संजय नामक यांनी सांगितले. गंभीर जखमी अवस्थेत मजुरास साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेची माहिती शिर्डी पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, प्रवीण दातरे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे वृत्त शहरात वार्‍यासारखे पसरताच दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *