पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की असं होतं! पडळकरांच्या टीकेला महसूल मंत्र्यांच्या कन्येचं प्रत्युत्तर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या राजकारणातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. थोरात यांनी पडळकरांना काही उत्तर देण्यापूर्वीच त्यांची कन्या अमृतवाहिनी कृषी व शैक्षणिक संस्थेच्या संचालक शरयू देशमुख यांनी उत्तर दिले आहे. पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं, अशा शब्दांत शरयू देशमुख यांनी पडळकरांना टोला लगावला आहे.

सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझ्या हाती सत्ता द्या, ओबीसींना चार महिन्यांत पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन.’ असे वक्तव्य केले होते. त्यावर टीका करताना महसूल मंत्री थोरात यांनी ‘फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. विदर्भ राज्याच्या मागणीसाठीही त्यांनी पूर्वी लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली होती.’ अशी टीका केली होती.

यावर आमदार पडळकर यांनी थोरातांना लक्ष्य केले होते. पडळकरांनी ट्वीट केले होते की, ‘महसूल मंत्री’ पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत… मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ पडळकर यांच्या या ट्वीटला थोरातांच्या कन्या शरयू देशमुख यांनी ट्वीटद्वारेच उत्तर दिले आहे, त्यांनी म्हटले आहे की, ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ अशा भाषेत त्यांनी पडळकर यांच्यावर टीका करून त्यांना भाषा आणि संस्काराची आठवण करून दिली आहे.

दरम्यान, शरयू देशमुख या थोरात यांच्या शिक्षण संस्थेची जबाबदारी सांभाळतात. अधूनमधून त्यांच्या राजकारण प्रवेशाचीही चर्चा होत असते. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. भाजपकडून संगमनेर मतदारसंघात शालिनी विखे यांना उमेदवारी देण्याची चाचपणी सुरू होती. तेव्हा काँग्रेसकडून थोरातांच्या कन्या देशमुख यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र, हे प्रत्यक्षात येऊ शकले नाही. त्यावेळी निवडणुकीत देशमुख यांनी आपल्या वडिलांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. तेव्हाही विरोधकांच्या आरोपांना त्या सडेतोड उत्तरे देत होत्या. आता त्याच पद्धतीने त्यांनी पडळकर यांना उत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *