संगमनेर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी कोरोना संकटात जपली माणुसकी! कोरोनाबाधित रुग्णांचे अंत्यसंस्कार करणार्‍या योद्ध्यांचा विशेष सन्मान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नागरिकांच्या मदतीसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेने सर्वात प्रथम विविध उपाययोजना करून जनतेला मोठा दिलासा दिला. या काळात मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी काहींचे नातलग पुढे येत नसताना नगरपरिषदेचे कर्मचारी अरविंद गुजर, सतीश बुरंगले व आनंद शेळके यांनी रुग्णांच्या अंत्यविधी करत दर्शवलेली माणुसकी ही सर्वांसाठी आदर्शवत ठरली आहे. या कोरोना योद्ध्यांचा महसूल मंत्री थोरात व आमदार डॉ. तांबे यांच्या हस्ते नगरपरिषदेकडून विशेष सन्मान करण्यात आला.

एकशे साठ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या संगमनेर नगरपरिषदेने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्यात सर्वात प्रथम नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबरोबरच जेवणाची व्यवस्था, औषधे पुरवणे, बेडची उपलब्धता करुन देणे, वैद्यकीय सुविधा देणे, रुग्णवाहिका, बायपॅप मशीन, आरटीपीसीआर मशीन उपलब्धता अशा अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या. संगमनेर हे वैद्यकीय सुविधा, व्यापार, बाजारपेठ, वदळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्याने राहाता, शिर्डी, कोपरगाव, पारनेर, श्रीरामपूर, सिन्नर, अकोले, जुन्नर अशा विविध भागांतून अनेक लोक उपचारासांठी येथे येत होते.

या सर्व काळामध्ये काहींना कोरोना बरोबर लढताना मृत्यूलाही सामोरे जावे लागले. कोरोनाची भीती, शासकीय नियम, अंत्यविधीसाठी अवघड परिस्थिती अशा काळात अनेक रुग्णांचे नातेवाईक जवळ येण्याचे टाळत असताना मृत झालेल्या रुग्णांची हेळसांड होऊ नये याकरिता नगरपरिषदेने सातत्याने पुढाकार घेतला. कोरोनाबाधित, कोरोना संशयित व इतर असे सुमारे 175 मृतांचा अत्यंविधी पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी अरविंद गुजर, सतीश बुरंगले, आनंद शेळके यांनी केले. 24 तास जागून अनेक रात्री त्यांनी काढल्या. अत्यंत प्रामाणिकपणे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आपण आहोत या मानवतेच्या भावनेतून मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार केले. या कोरोना योद्ध्यांनी संकटात जपलेली ही माणुसकी सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे. याप्रसंगी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल, शहरातील सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *