‘आई माझी काळुबाई’ मालिकेत प्राजक्ता गायकवाड

‘आई माझी काळुबाई’ मालिकेत प्राजक्ता गायकवाड
नायक वृत्तसेवा, नगर
सोनी मराठी वाहिनीवर 14 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत प्राजक्ता गायकवाड ही आर्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या प्रोमोला आणि प्राजक्ताच्या नव्या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली आहे.


या मालिकेत प्राजक्ता आर्या या कॉलेज तरुणीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेबद्दल विचारलं असता ती म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच माझ्या वयानुरूप भूमिका करणार आहे आणि या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे.’ गेल्याच वर्षी मांढरदेवी काळुबाईच्या दर्शनाचा योग प्राजक्ताला आला होता आणि यावर्षी ही भूमिका मिळाली. त्यामुळे हा काळुबाईचा आशीर्वादच आहे; असं प्राजक्ता समजते. प्राजक्ताच्या घरातही भक्तिमय वातावरण आहे. त्यामुळे आई काळुबाईवरची ही मालिका स्वीकारताना तिला खूप आनंद झाला. नवीन मालिकेत प्राजक्ताचं दिसणंही नवीन असणार आहे. या भूमिकेसाठी प्राजक्तानं स्वतःवर बरेच काम केले असून तिने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. या मालिकेचं चित्रीकरण सातार्‍याला सुरू आहे. आर्याच्या भूमिकेसाठी तिनं वजन कमी केलं असून हेअर स्टाईल सुद्धा बदलली आहे. आई माझी काळुबाई ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेत काळुबाईची भूमिका अलका कुबल साकारणार आहेत. तरी 14 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठी वाहिनीवर ‘आई माझी काळुबाई’ पहायला विसरु नका असे आवाहनही प्राजक्ताने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *