अगस्ति कारखान्यातील सत्ताधार्‍यांच्या राजीनामा नाट्याने विरोधकांसमोर पेच! सर्व संचालकांनी दिले राजीनामे; विरोधकांच्या प्रत्युत्तराकडे तालुक्याचे लागले लक्ष

नरेंद्र देशमुख, अकोले
तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ति साखर कारखान्याच्या गैरव्यवस्थापनावरुन गेल्या एक वर्षापासून आरोपांची राळ उठविणार्‍या विरोधकांना सत्ताधार्‍यांनी सोमवारी (ता.14) पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन जोरदार उत्तर दिले आहे. अठरा संचालकांनी आपले राजीनामे कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांच्याकडे सुपूर्द केले आहे. जर तुम्ही कारखाना सक्षमपणे चालविणार असतील तर मी देखील राजीनामा देतो असे आव्हानही पिचड यांनी विरोधकांना दिले आहे. त्यामुळे विरोधकांसमोर मोठा पेच निर्माण झाला असून या आव्हानास ते कसे प्रत्युत्तर देतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

अगस्ति सहकारी साखर कारखान्यावर 326 कोटींचे कर्ज असून कारखाना अर्थिक गर्तेत सापडला आहे. त्यामुळे आता कारखान्याच्या कारभारात व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे असे मत शेतकरी नेते दशरथ सावंत, माजी प्रशासकीय अधिकारी बी.जे.देशमुख, डॉ.अजित नवले व स्व.मारुती भांगरे यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व गावोगावी बैठका घेऊन व्यक्त केले होते. परंतु, त्यास सत्ताधार्‍यांकडून अपेक्षित उत्तरे मिळत नव्हते. सन 2020-2021 चा गळीत हंगाम निर्विघ्न पार पाडावा म्हणून सत्ताधार्‍यांकडून संयम पाळला जात होता. त्यात गेटकेनचा ऊस अगोदर गाळप करताना तालुक्यातील ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला. सुमारे दोन ते अडीच महिने ऊस शेतातच राहिल्याने वजन घटण्याबरोबरच शेतात दुसरे पीक घेता न आल्याने शेतकर्‍यांचेही आर्थिक नुकसान झाले. त्याबरोबर ऊसतोडणी कामगार अडून पाहत असल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण झाला होता.

अगस्तिने सुरू केलेल्या आसवनी प्रकल्पात इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकारची परवानगी न मिळाल्याने इथेनॉल ऐवजी स्पिरीट तयार करावे लागल्याने कारखान्याला या गळीत हंगामात अपेक्षित आर्थिक लाभ झाला नाही. त्यामुळे सत्ताधारी आणखीनच दबावात आले होते. विरोधकांनी महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या तक्रारींमुळे साखर आयुक्तांनी लेखा परीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून तिने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. कामगार व ऊस तोडणी वाहतूकदारांचे पैसे देण्यासाठी संचालकांच्या नावावर पतसंस्थेमधून कर्ज घेवून देणी देण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न होता. तसेच नवीन हंगामाची तयारी करण्यासाठी जिल्हा बँकेकडून पतपुरवठा करण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्न करत असतानाच विरोधकांनी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना संपर्क करून त्यात खोडा घातला गेला. त्यामुळेच अखेर कडेलोट होऊन अध्यक्ष मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर व संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेऊन अगस्ति कारखान्याची सद्यस्थिती विशद केली.

कारखान्यावर आजअखेर 365 कोटींचे कर्ज असून त्यात खेळते भांडवली कर्ज 184 कोटी आहे. तर शिल्लक साखरसाठा 193 कोटींचा आहे. तसेच स्थावर मालमत्तेचे योग्य मूल्यांकन केलेले आहे. कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत 30 जून असून कारखाना कोणत्याही वित्तीय संस्थांचा थकबाकीदार नाही. याउलट विरोधकांनी कायमच कारखान्याच्या प्रगतीत खोडा घातला असून संगमनेरचा जूना 1200 मेट्रीक टन क्षमतेचा कारखाना भंगार म्हणून घेऊ दिला नाही. तसेच इथेनॉलचा परवाना दहा वर्षांपूर्वीच मिळालेला असताना अगस्तिच्या नावाने दारू निर्मिती नको म्हणून विरोध करणारे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना माहीत आहे.

विरोधकांना साधी पिठाची गिरणी चालविण्याचाही अनुभव नाही असा टोलाही त्यांनी मारला. विरोधकांना हा सहकारी कारखाना बंद पाडून खासगी कारखाना सुरू करायचा आहे असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला. आता विरोधक एकीकडे तर सत्ताधारी दुसरीकडे आणि त्यांच्या कात्रीत कामगार व सभासद सापडल्याने सत्ताधार्‍यांकडून टाकलेल्या चेंडूला विरोधक कसे सामोरे जातात याबाबत उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *