जिल्हाधिकार्‍यांकडून राहुरीच्या आरोग्य व्यवस्थेबाबत नाराजी अचानक भेटीने अधिकारी व कर्मचार्‍यांची उडाली एकच धावपळ

नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरीला जिल्हाधिकार्‍यांनी अचानक भेट देत आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यात, अनेक त्रुटी आढळल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली. कामचुकार, हलगर्जीपणा करणारे डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरत कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले. तसेच कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती व आस्थापनांवर कारवाई करण्याचे निर्देश तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या समवेत आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.दयानंद जगताप, निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार पूनम दंडीले, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दीपाली गायकवाड उपस्थित होते.

तत्पूर्वी, जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी राहुरी ग्रामीण रुग्णालय व शासनाच्या बालाजी मंदिरातील कोविड केअर सेंटरला अचानक भेट दिली. त्यामुळे डॉक्टर व अधिकार्‍यांची धावपळ उडाली. जिल्ह्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती व आस्थापनांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिले.


गर्दी होणार नाही याची काळजी घ्या!
जिल्ह्यात काही घटकांना ठराविक वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनीही कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *