अकोल्यातील परिचारिकेने संगमनेरात केलेल्या लसीकरणाच्या ‘फेरचौकशीचे’ आदेश! संगमनेरात लसीकरण झाल्याचे अधिकार्‍यांनीच केले सिद्ध; अकोल्याच्या अधिकार्‍यांचे मात्र कानावर हात..

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या संगमनेरातील एका परिचारिकेने अकोल्यातील लशींच्या वायल संगमनेरात आणून आपल्या हितसंबंधी नागरिकांचे लसीकरण घडवून आणले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दैनिक नायकने ‘बांधिलकी जनहिताची’ या ब्रीद वाक्यानुसार या संपूर्ण प्रकरणावर सत्याचा झोत टाकल्याने अकोल्यासह संगमनेरातही खळबळ उडाली होती. खरेतर सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असूनही अकोल्याच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी केवळ चौकशीचा फार्स राबवून ‘त्या’ परिचारिकेला एकप्रकारे पाठिशी घातले होते. मात्र गुरुवारी अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मोठी खडाजंगी झाली व अखेर अकोल्याचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार मुकेश कांबळे यांनी या गंभीर प्रकरणाच्या सखोल फेरचौकशीचे आदेश दिले आहेत.

मागील महिन्यात संगमनेरात राहणार्‍या मात्र अकोले तालुक्यातील ‘खिरविरे’ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावणार्‍या एका परिचारिकेने संगमनेरात काही जणांचे लसीकरण घडवून आणले होते. याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यात तथ्य आढळल्यानंतर दैनिक नायकने आपली सामाजिक बांधिलकी जोपासतांना या प्रकरणामागील सत्य समोर आणले. एकीकडे अकोल्यातील आदिवासी बांधव लसीकरणासाठी भल्या पहाटेपासून रांगा लावून तासन्तास लशींची प्रतिक्षा करीत असतांना त्यांच्या हक्काच्या लशी कोणत्याही वरीष्ठ अधिकार्‍याच्या परवानगीशिवाय परस्पर कार्यक्षेत्राच्या बाहेर नेल्याने व लाभार्थ्यांशिवाय अन्य नागरिकांचे लसीकरण केले गेल्याने अकोल्यासह संगमनेरातूनही संताप उसळला. दैनिक नायकच्या वृत्तानंतर अनेकांनी परखडपणे सत्य समोर आणल्याबद्दल दैनिक नायकचे अभिनंदनही केले.


अकोल्यातील ‘लशी’ परस्पर संगमनेर तालुक्यात गेल्याने अकोल्यातील संताप शांत करण्यासाठी इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार मुकेश कांबळे यांनी या प्रकरणाच्या चौकशी आदेश दिले. त्यानंतर अकोल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन ‘खिरविरे’ प्राथमिक केंद्रातील कोणत्याही लशी गहाळ झाल्या नसल्याचा अहवाल त्यांना सोपवून सदरचे प्रकरण एकप्रकारे बंद केले. मात्र म्हणतात ना; सत्य कधीही लपून राहत नाही. त्याप्रमाणे नंतरच्या कालावधीत लशींचा मोठा तुटवडा निर्माण होवून अकोल्यात अव्यवस्था निर्माण झाल्याने लसीकरणाबाबत पारदर्शक धोरण ठरवण्यासाठी अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी गुरुवारी अधिकार्‍यांसह आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गेल्या महिन्यातील 15 मे रोजी दैनिक नायकमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत अकोल्यातील काही पत्रकारांनी लशीकरणाच्या ‘गोंधळा’कडे आमदारांचे लक्ष केंद्रीत केले.

हा विषय अतिशय गंभीर स्वरुपाचा असून दोषी असलेल्यांना पाठिशी घातले जावू शकत नाही, त्यामुळे या प्रकरणाला गांभिर्याने का घेतले गेले नाही असा सवाल त्यांनी अधिकार्‍यांना विचारला. त्यावर अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दैनिक नायकमध्ये सदरचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अकोल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील लशींच्या वायल अन्यत्र गेल्याच नसल्याचा आश्चर्यकारक निष्कर्ष काढला व तसा अहवाल सोपविल्याची बाब त्यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र दैनिक नायकच्या सविस्तर वृत्तात ‘त्या’ परिचारिकेने राबविलेल्या लसीकरणाचा लेखाजोखाच असल्याने व माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणारे वृत्त ऐकीव माहितीच्या नव्हेतर तथ्यांच्या आधारावर प्रसिद्ध होत असते ही गोष्ट काही पत्रकारांनी स्पष्ट केल्यानंतर आमदारांनी या प्रकरणाची अतिशय गांभिर्याने दखल घेवून तत्काळ सखोल चौकशी करण्याची सूचना केली, त्यानुसार तहसीलदार मुकेश कांबळे यांनी तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना सखोल चौकशी करण्याचे फेरआदेश बजावले आहेत.

वास्तविक संगमनेरातील वाडेकर गल्ली, चंद्रशेखर चौक आणि परिसरात झालेल्या परस्पर लसीकरणाची चर्चा संगमनेरात पसरल्यानंतर संगमनेरच्या प्रशासनासह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाने प्राथमिक माहितीच्या आधारावर रुग्णालयातील एका परिचारिकेनेच हा प्रकार केल्याचे समजून या संपूर्ण प्रकरणाचे खापर त्यांच्याच माथ्यावर फोडले होते. मात्र न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणार नाही या सूत्रानुसार ‘त्या’ परिचारिकेनेच या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. त्यातूनच अकोल्यातील खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या ‘त्या’ परिचारिकेने सदरचे लसीकरण घडवून आणल्याचे सिद्ध झाले. त्याची सत्यता पटल्यानंतर स्थानिक अधिकार्‍यांनी संशय घेतलेल्या त्या परिचारिकेला दोषमुक्त केले. मात्र सदरचा प्रकार अकोल्यात घडूनही तेथील वैद्यकीय अधिकारी मात्र खिरविरे येथील एकही लस गायब नसल्याचा अहवाल देत त्या परिचारिकेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याने अकोल्याच्या आरोग्य विभागाबाबतच संशय निर्माण झाला आहे. आता या प्रकरणाच्या फेरचौकशीचे आदेश देण्यात आल्याने त्यातून आतातरी सत्य बाहेर येते की दडवले जाते याकडे अकोले व संगमनेर तालुक्याचे लक्ष खिळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *