‘तीनबत्ती’ हल्ला प्रकरणातील चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर! संगमनेर शहर पोलिसांचा ‘चालढकलपणा’ हल्लेखोरांच्या पथ्यावर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी राबविलेल्या धरपकड मोहीमेनंतर शहर पोलिसांकडून ‘तीनबत्ती’ प्रकरणात चालढकलपणा सुरु आहे. पोलिसांची ही भूमिका सामान्यांसाठी आश्चर्यकारक ठरली असून त्याचा थेट फायदा थेट पोलिसांना मारहाण करणार्‍यांना होत असल्याचे समोर आले आहे. जवळपास महिन्याभरापूर्वी घडलेल्या या प्रकरणात प्रत्यक्षात 35 आरोपी निष्पन्न होवूनही आत्तापर्यंत केवळ चौदाजणांना अटक व सुटकाझाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 6 मे रोजी घडलेल्या या किरकोळ प्रसंगाला हल्ल्याचे स्वरुप देणार्‍या एकाही सूत्रधाराला गजाआड करण्यात पोलीस अपयशी ठरलेले असतांनाच संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलिसांच्या मुखी ‘पसार’ असलेल्या चौघा संशयितांना ‘अटकपूर्व’ जामीन मंजूर केला आहे.

गेल्या महिन्यात 6 मे रोजी मोगलपूरा परिसरात गर्दी करणार्‍या जमावाला पांगवणार्‍या पोलीस पथकावर जमावाने हल्ला करण्याची संतापजनक घटना घडली होती. यावेळी जमावातील काहींनी चिथावणी दिल्याने गर्दीतील तरुणांनी बंदोबस्तावरील पो.कॉ.सलमान शेख, प्रशांत केदार व भगीरथ देशमाने या तिघा कर्मचार्‍यांना धक्काबुक्की व मारहाण केली. जवळपास दिडशे ते दोनशे जणांच्या जमावातून या तिघाही पोलीस कर्मचार्‍यांनी शिताफीने आपली सुटका केल्याने त्यांचा जीव वाचला, अन्यथा अनर्थ घडण्याचीही शक्यता होती. या घटनेनंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांकडून धडक कारवाई होणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात मात्र त्यांनी या अत्यंत गंभीर घटनेबाबत आपल्या वरीष्ठांनाच अंधारात ठेवण्याचा धक्कादायक. वरीष्ठांना काही पत्रकारांकडून ही माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी उशीराने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला हे विशेष.

या धक्कादायक आणि अत्यंत संतापजनक प्रकारानंतर दुसर्‍याच दिवशी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांना तातडीच्या कौटुंबिक कामासाठी रजेवर जावे लागले. त्या दरम्यानच्या काळात संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी या प्रकरणाची सूत्र आपल्या हाती घेत आरोपींच्या शोधासाठी तब्बल तीनवेळा छापासत्र राबविले. त्यातून सुरुवातीला चार, नंतर नऊ व एक अशा चौदा जणांना अटक करण्यात आली व नंतर त्यांची जामीनावर सुटकाही झाली. पोलिसांकडून अटकसत्र सुरु झाल्यानंतर बहुतेक संशयित पसार झाले. या दरम्यान त्यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरु असल्याबाबतही पोलिसांना माहिती मिळाली मात्र रमजान ईदचा सण तोंडावर असल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी तो पर्यंत धरपकड थांबवली. ईदनंतर शहर पोलीस निरीक्षक देशमुख कर्तव्यावर हजर झाल्याने निष्पन्न झालेल्या मात्र अटकेपासून दूर असलेल्या आरोपींची आता खैर नाही अशीच अपेक्षा होती, मात्र पोलिसांच्या चालढकल भूमिकेने ती ‘फोल’ ठरवली आणि त्याचा थेट फायदा पोलिसांना मारणार्‍या आरोपींना मिळाला.

या प्रकरणात निष्पन्न झालेल्या शोहेब अनिस पठाण (वय 29, रा.नायकवाडपूरा), निसारखान बशीरखान पठाण (वय 65) व जुबेरखान निसारखान पठाण (वय 38, दोघेही रा.भारतनगर) आणि सोहेल मुक्तार शेख (वय 19, रा.सय्यदबाबा चौक) या चौघांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करीत या प्रकरणात यापूर्वीच चौदा जणांना अटक झालेली असल्याने नव्याने अटक करण्याची गरज नाही हा मुद्दा मान्य करुन वरील चौघांनाही अटकेपासून संरक्षण दिले. जवळपास महिन्याभरापूर्वी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज, व्हिडिओ चित्रीकरण आणि अटकेतील आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरुन जवळपास 35 पेक्षा अधिक आरोपींची ओळख पटविली आहे. त्यातील चौदा जणांना अटक व सुटका झाली, तर चौघांना अटकपूर्व जामीन मिळाला. यापुढेही पोलिसांची भूमिका अशीच राहील्यास या प्रकरणातील उर्वरीत आरोपीही याच मार्गाने अटकेपासून दूर जाण्याची शक्यता आहे.

कायद्याचे रक्षण करणार्‍यांवर जेव्हा हल्ला होतो, तेव्हा सर्वसामान्य नागरिकांमध्ये चीड निर्माण होते. गेल्या 6 मे रोजी तीनबत्ती चौकात घडलेल्या या धक्कादायक घटनेचे पडसाद केवळ संगमनेर अथवा अहमदनगर जिल्हच नव्हेतर संपूर्ण राज्यात उमटले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यातील पत्रकारांनीही याबाबत बोलते करण्याचा प्रयत्न केला होता. असे असतांनाही स्थानिक पोलिसांची मात्र या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याची मानसिकताच आजवर दिसली नाही. त्यामुळे शहर पोलिसांबाबत आश्चर्य व्यक्त होत असून सामान्यांच्या मनात संशयही निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *