भाजीपाला व्यापार्‍यांनी उपनिबंधकांचा आदेश धुडकावला! मनाई असतानाही संगमनेरच्या बाजार समितीतच होताहेत भाजीपाल्याचे लिलाव..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोविड संसर्ग पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी 31 मे पर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होणार भाजीपाला व फळांचेे लिलाव बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हाधिकार्‍यांशी पत्र व्यवहार करुन टोमॅटो व अन्य शेतीमाल नाशवंत असल्याने व संगमनेर हे टोमॅटो उत्पादनाचे जिल्ह्यातील मोठे आगार असल्याने संगमनेरऐवजी वडगाव पान येथील उपबाजार समितीमध्ये फळे व भाजीपाला लिलाव घेण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार अहमदनगर व संगमनेर येथील उपबाजार समित्यांमध्ये लिलाव घेण्यास सशर्त परवानगी देण्यात आली होती, मात्र संगमनेरच्या फळ व भाजीपाला व्यापार्‍यांनी बाजार समितीसह सहकार उपनिबंधकांचे आदेश धुडकावून संगमनेरातच लिलाव घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता, मात्र वरीष्ठ अधिकार्‍यांनी आज पदाधिकारी व व्यापार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर गुरुवारपासून (ता.27) वडगाव पान येथील उपबाजार समितीतच व्यवहार करण्यावर एकमत झाले.

जिल्ह्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 17 मे रोजी बैठक बोलावली होती. या बैठकीत जिल्ह्यातील वाढत्या रुग्णांचे प्रमाण लक्षात घेवून रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार 31 मे पर्यंत बंद ठेवण्यावर समितीचे एकमत झाले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी 18 मे रोजी आदेश काढून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यासोबतच शेतकर्‍यांना आपला शेतमाल विक्री करता यावा यासाठी विकेंद्रीत पद्धतीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही आदेशीत करण्यात आले होते. यात समन्वयकाची भूमिका पार पाडण्यासाठी सहकार खात्याच्या जिल्हा उपनिबंधकांची नियुक्तीही करण्यात आली होती.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर 18 मे रोजी संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने पत्रव्यवहार करुन 12 ते 23 मे या कालावधीत संगमनेरच्या बाजार समितीमधील सर्व हमाल व माथाडी कामगारांनी लसीकरण व विमा कवच मागणीसाठी काम बंद ठेवले होते. तत्पूर्वीच कांदा लिलावही बंद ठेवण्यात आल्याचे बाजार समितीने पत्राद्वारे जिल्हाधिकार्‍यांना कळविले. तसेच संगमनेर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधीक टोमॅटोचे उत्पादन होते. टोमॅटो हा नाशवंत प्रकार असल्याने त्याचे व्यवहार थांबविल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याची भीतीही या पत्रातून वर्तविण्यात आली होती. त्यामुळे फळे व भाजीपाल (कांदा वगळून) बाजार समितीमध्ये व्यवहार करण्याची परवानगी द्यावी, त्यासाठी वडगाव पान येथील उपबाजार समितीमध्ये पर्यायी व्यवस्था करण्याची तयारीही दाखवण्यात आली होती.

याबाबतचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने 24 मे रोजी पुन्हा बैठक घेवून अहमदनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीऐवजी नेप्ती येथील व संगमनेर शहरातील बाजार समितीऐवजी वडगाव पान येथील उपबाजार समितीत तर राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व श्रीगोंदा येथील मुख्य बाजार समितीच्या आवारात कोविड नियमांचे पालन करुन फळे व भाजीपाला (कांदा वगळून) व्यवहार करण्यास सकाळी 7 ते 11 या वेळेत सशर्त परवानगी दिली आहे. मात्र खुद्द बाजार समितीने पर्याय देवूनही संगमनेरच्या फळे व भाजीपाला व्यापार्‍यांनी वडगाव पान बाजार उपसमितीत जाण्यास नकार देत जिल्हाधिकार्‍यांसह संगमनेरच्या उपनिबंधकांचे व बाजार समितीचेही आदेश धुडकावून मंगळवार व आज बुधवारी संगमनेर शहरातील बाजार समितीच्या प्रांगणातच व्यवहार केले.

त्याची दखल घेवून संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम, संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, सचिव सतीश गुंजाळ आदींच्या उपस्थितीत व्यापार्‍यांसोबत आज सकाळी बाजार समितीत बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे यांनी कोविड नियमांचे पालन करावेच लागेल त्यासाठी व्यापार्‍यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. तहसीलदार निकम यांनी तालुक्यातील कोविड संक्रमणाची स्थिती सर्वांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर व्यापार्‍यांनी गुरुवारपासून (ता.27) वडगाव पान येथील उपबाजार समितीच्या आवारातच फळे व भाजीपाल्याचे व्यवहार करण्यास संमती दिली आणि अखेर गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेली टोलवाटोलवी संपली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *