भाऊसाहेब गायकरांची अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती

नायक वृत्तसेवा, अकोले
पोलीस दलातील वरीष्ठ अधिकार्‍यांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर गृह विभागाला मुहूर्त मिळाला असून अकोले तालुक्यातील कळंब गावचे सुपुत्र व सह्याद्री विद्यालयाचे माजी विद्यार्थी वरीष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गायकर यांची महराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती झाली असून, नुकताच पदभारही स्वीकारला आहे.

भाऊसाहेब गायकर यांची 33 वर्षे निष्कलंक सेवा झाली आहे. याकाळात त्यांनी अनेक बक्षिसे पटकावली आहेत. त्यांचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. वडील कळंब गावातच सालकरी म्हणून दोनशे पंचाहत्तर, पाचशे व नऊशे रुपयांनी कामाला होते. आईने मागे हटायचे नाही म्हणून बजावले होते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून त्यांनी आई-वडिलांचे स्वप्न साकार केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कळंब येथे झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री विद्यालयात झाले. तर अकरावी ते बी.कॉमपर्यंतचे शिक्षण अकोले महाविद्यालय येथे झाले. पदवीनंतर कळंब गावातील तत्कालीन सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मारुती लांडगे हे त्यांना पुण्याला शिक्षणासाठी घेऊन गेले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण गरवारे महाविद्यालय पुणे येथे झाले. तेथील आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन कोल्हटकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. कळंबचे रंगनाथ लांडगे यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था केली. पाटबंधारे सचिव रोमा तथा बाळासाहेब लांडगे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुणे केंद्रातून तिसरे आले होते. पुढे पीटीसी नाशिक येथे ट्रेनिंग करून मुंबईला अंधेरी, शिवाजी पार्क, मालवणी, समतानगर पोलीस ठाणे येथे नोकरी केली. एसपीयू विशेष सुरक्षा विभाग येथे नोकरी करताना बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार, अमिताभ बच्चन, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मोरारजी देसाई, छगन भुजबळ यांचे अंगरक्षक म्हणून काम केले. पुढे पोलीस निरीक्षक म्हणून नागपूर येथे नंदनवन, कोराडी पोलीस ठाण्यात काम केले. नागपूरला पंचवीस खुनांचे गुन्हे, तसेच इतर गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला. अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले. एकूण सात जणांना जन्मठेपेची शिक्षा तर वीस गुंडांना तडीपार केले. तसेच सायबर सेल नवी मुंबई येथे प्रभारी असताना चाळीस लाख रुपये तक्रारदारास मिळवून दिले. एका बनावट कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला व पन्नासच्यावर गुन्हेगारांना अटक केली. त्यांनी नोकरीच्या कालखंडात दोनशेच्या वर बक्षीसे व रोख तीस हजार रुपये बक्षीस पटकावले आहे. याबद्दल गायकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *