राहाता तालुक्यात वेगवेगळ्या घटनांत चौघांचा मृत्यू! दोघांचा गळफास, एका महिलेचा विषारी औषध सेवनाने तर दुसरीचा अकस्मात मृत्यू

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पुणतांब्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली तर एका तरुणीने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली आहे. तर चौथ्या घटनेत एका महिलेचा अकस्मात मृत्यू झाला आहे. एकूणच तालुक्यात चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यामध्ये पहिल्या घटनेत विजया राजेंद्र कोळपकर (वय 60) या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. याप्रकरणी राहाता पोलिसांत अकस्मात मृत्यू क्रमांक 21 नुसार नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शिंदे हे करीत आहे. दरम्यान, महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत परिसरात चर्चा सुुरु होती.


दुसर्‍या घटनेत पुणतांबा गावातील कृषी विद्यापीठाच्या शेतात चिंचेच्या झाडाला धनंजय सुरेश थोरात (वय 23) याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्याला उपचारासाठी पुणतांब्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक 19 प्रमाणे नोंद केली आहे. पुढील तपास मुख्य हवालदार मंडलिक हे करत आहे.

तिसर्‍या घटनेत पिंपळस परिसरातील तरुण महिला मीना अविनाश कापसे (वय 35) हिने विषारी औषध सेवन केल्याने तिला तातडीने शिर्डी येथील श्रीसाईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासले असता ती मयत असल्याचे सांगितले. याबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक 20 नुसार नोंद केली आहे.

तर चौथ्या घटनेत कोल्हार बु्रद्रुक येथील गंगाधर बालाजी कोळपे (वय 77) यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांना तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार लोणी पोलिसांत अकस्मात मृत्यू क्रमांक 41 नुसार नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *