राजहंस दूध संघाकडून शेतकर्‍यांना कायमच मदतीचा हात ः थोरात 110 मेट्रिक टन चारा बियाणांच्या मोफत वितरणास सुरुवात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दूध उत्पादक शेतकरी हाच दूध संघाचा पाया आहे. संकट काळात मदत करणे ही तालुक्यातील सहकारी संस्थांची संस्कृती आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना आधार मिळावा यासाठी चारा व बियाण्यांसह राजहंस दूध संघाने कायमच शेतकर्‍यांना मदत केली असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघात प्रातिनिधीक स्वरूपात दूध उत्पादक शेतकर्‍यांना बियाणे वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, महानंद तथा राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, जी.एस.शिंदे आदी उपस्थित होते. दूध उत्पादक शेतकरी गोरक्ष नवले, संभाजी गुंजाळ, भाऊसाहेब राऊत, बाळासाहेब आगलावे, अर्जुन राऊत यांना मंत्री थोरात यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात चारा बियाणे वाटप करण्यात आले.

दूध व ऊस हे शाश्वत उत्पादनाचे साधन आहे. दूध व्यवसायातून ग्रामीण भागात मोठी क्रांती झाली आहे. गोरगरीब कुटुंबियांना या व्यवसायातून मोठा हातभार लागला आहे. राजहंस दूध संघाने कायम आपली सामाजिक बांधिलकी जपत अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना व दूध उत्पादकांना मोठी मदत केली आहे. कोरोनाचे संकट सर्वत्र असतानाही एक दिवसही बंद न ठेवता दूध संघाने सातत्याने दूध स्वीकारले आहे. दूध कमी झाले की एक रुपयासाठी अनेक शेतकरी इतर खासगी दूध संघांना दूध पुरवतात आणि त्यांनी ते घेतले नाही की पुन्हा आपल्याकडे येतात. मात्र तरीही या संघाने कायम सर्वांना सामावून घेतले आहे. गुणवत्तेची परंपरा राखल्याने आज राजहंस दूध संघाचा नावलौकिक झाला असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

महानंद तथा राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले, जगभरात कोरोना रोगाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. याचा सर्वच उद्योग धंद्यांना व दुग्ध व्यवसायाला देखील मोठा फटका बसला आहे. शहरातील व ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे हॉटेल, मंदिर, महाविद्यालय, शाळा व इतर सर्व व्यवसाय तसेच लग्न कार्यक्रम बंद असल्यामुळे दुधाची मागणी कमी झाली आहे. त्याचा तोटा दूध संघ व दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे. दूध उत्पादक हा दूध संघाचा पाया असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अडचणीच्या काळात दूध उत्पादकांना मदत व्हावी; यासाठी राजहंस दूध संघाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे चारा बियाणे मागणी केली होती. त्यापैकी 110 मेट्रिक टन बियाणे प्राप्त झाले आहे. मका, ज्वारी, बाजरी, गवत या चारा पिकांचे बियाणे स्थानिक दूध संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोफत दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *