राहुरी विद्यापीठाने आमराईतून कमावले एक कोटी! शेतकर्‍यांनीही आंबा लागवडीकडे लक्ष देण्याचे आवाहन

नायक वृत्तसेवा, राहुरी
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आंब्याच्या बागेमधून बियाणे विभागाने 70 लाख व उद्यान विद्या विभागाने 19 लाख तसेच अन्य विभागांमधून सुमारे 11 लाख रूपयांच्या आंब्यांची विक्री केली आहे. आमराईमुळे विद्यापीठाच्या महसुली उत्पन्नामध्ये घसघशीत वाढ झाली आहे.

यावर्षी संशोधन संचालक डॉ.शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.आनंद सोळंके, डॉ.चंद्रकांत साळुंखे, डॉ.युवराज बालगुडे, प्रक्षेत्रावरील बियाणे विभागांच्या सर्व अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी मेहनतीने फळबागेचे नियोजन केले.

झाडांची योग्य काळजी घेतल्यामुळे पावसाच्या तसेच पाटाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन, फळ धारणेच्या झाडांच्या संख्येचे योग्य नियोजन करून गेली दोन महिने झटून आंब्याचे उत्पन्न वाढविले. विद्यापीठाचे बियाणे विभागाचे व उद्यान विद्या विभागाच्या सर्व कनिष्ठ कर्मचार्‍यांनी कोरोनाची भीती असून देखील तसेच कमी कर्मचार्‍यांवर हे कार्य सुरू ठेवले होते.
गेल्या चार पाच वर्षांपासून ई-निविदा प्रक्रियेतून आंब्यांच्या बागांचा लिलाव करण्यात येतो. आंबा व्यापार्‍यांसोबत ऑनलाईन झूम मिटींगद्वारे ई-निविदा प्रक्रिया पार पाडली. विद्यापीठाच्या आंब्यामध्ये प्रामुख्याने केशर, लंगडा, हापूस, तोतापुरी, स्थानिक गावरान वाण, साई सुगंध व वनराज या जातींच्या आंब्यांचा समावेश होतो.


विद्यापीठाच्या अ व ब विभागामध्ये नव्याने 3 हजार 500 केशर आंब्याच्या रोपांची ठिबक सिंचनावर लागवड करण्यात येणार आहे, संरक्षित पाण्यासाठी 1 कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे. विद्यापीठ स्थापनेपासून प्रथमच हा भाग लागवडीखाली येत आहे.
– डॉ.आनंद सोळंके (प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे विभाग)


शेतकर्‍यांनी हमखास उत्पन्न देणार्‍या आंब्याच्या लागवडीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. डाळिंब पिकापेक्षा फवारणी कमी, कमी धोका आंब्याच्या लागवडीमध्ये दिसून येतो.
– डॉ.श्रीमंत रणपिसे (उद्यान विद्या विभाग प्रमुख, राहुरी विद्यापीठ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *