अहमदनगर जिल्ह्याने ओलांडला दोन लाख रुग्णसंख्येचा टप्पा! आजही आत्तापर्यंतची सर्वाधीक रुग्णसंख्या; संगमनेरातील कोविडचा उद्रेकही कायम..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात कोविड संक्रमणाने अक्षरशः कहर केला असून दररोजच्या रुग्णवाढीमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा आता समोर येवू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या कोविड रुग्णसंख्येने आज आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले असून 4 हजार 594 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज संगमनेर तालुक्यातही कोविडचा प्रचंड उद्रेक दिसून आला असून तब्बल 381 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 17 हजार 487 झाली आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील 48 जणांचा समावेश असून त्यातील तब्बल चाळीस जणांनी आपला पूर्णपत्ता केवळ ‘संगमनेर’ असा नोंदविलेला आहे.


कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेत संगमनेर तालुक्यातील जवळपास सर्वभागात आणि संगमनेर शहरातील चौकाचौकात आणि गल्लीबोळात कोविड पोहोचला असून दररोज समोर येणार्‍या बाधितांच्या संख्येत यापूर्वी सुरक्षित असलेल्या भागातील रुग्णही आढळत आहेत. एकीकडे जिल्ह्यासह शहरात ‘कठोर निर्बंधा’च्या नावाखाली मनसोक्त फिरण्याचा प्रयोग सुरु आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात खाटा मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः जीवाचे रान करीत असल्याचे भयानक दृष्यही सध्या दिसत आहे.

त्यामुळे निर्बंध लागू असतांनाही ना जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत कोणता फरक पडला, ना संगमनेर तालुक्याच्या. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात राहाता तालुक्यातून सरासरी 230 रुग्ण दररोज या गतीने 6 हजार 915 रुग्ण आढळले होते, तर संगमनेर तालुक्यात सरासरी 215 रुग्ण दररोज या वेगाने 6 हजार 445 रुग्ण समोर आले होते. चालू महिन्यातील पहिल्या सात दिवसांनी मात्र ही परिस्थिती अगदी उलटी केली असून आजच्या स्थितीत संगमनेर तालुक्यातील सरासरी रुग्णगती तब्बल 330 रुग्ण दररोज इतकी प्रचंड आहे. तर राहात्याची सरासरी रुग्णवाढ 273 रुग्ण दररोज या प्रमाणे होत आहे.


आज शासकीय प्रयोगशाळेचे 170, खासगी प्रयोगशाळेचे 202 आणि रॅपीड अँटीजेनद्वारा दहा अहवालांमधून संगमनेर तालुक्यातील 381 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येतही शहरी रुग्णांमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून आले. आजच्या अहवालांमध्ये संगमनेर शहरातील 48 जणांचा समावेश आहे. मात्र त्यातील तब्बल 40 रुग्णांनी आपला पूर्ण पत्ता नोंदवितांना केवळ ‘संगमनेर जि.अहमदनगर’ असा उल्लेख केला असल्याने सदरील रुग्ण नेमके शहरातील, ग्रामीणभागातील की अन्य तालुक्यातील अशी शंका निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून असा अर्धवट पत्ता नोंदविलेल्या असंख्य रुग्णांचा समावेश होवू लागल्याने काहीसा संशयही निर्माण झाला आहे. तालुक्यातील आजच्या रुग्णवाढीने एकूण रुग्णसंख्येचा डोंगर आता 17 हजार 487 झाला आहे.


जिल्ह्याने ओलांडला दोन लाख रुग्णसंख्येचा टप्पा..!
जिल्ह्यात आज आत्तापर्यंतची उच्चांकी 4 हजार 594 रुग्णसंख्या समोर आली आहे. यापूर्वी 1 मे रोजी 4 हजार 219, 5 मे रोजी 4 हजार 475 व 6 मे रोजी 4 हजार 339 रुग्ण समोर आले होते. चालू महिन्यात जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची गतीही चिंताजनक अवस्थेत पोहोचली असून गेल्या सातच दिवसांत जिल्ह्यात दररोज सरासरी तब्बल 3 हजार 905 रुग्ण या प्रचंग गतीने 27 हजार 335 रुग्णांची भर पडली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 1 हजार 9, खासगी प्रयोगशाळेचे 2 हजार 665 व रॅपीड अँटीजेनद्वारा 920 अहवालांद्वारे जिल्ह्यातील 4 हजार 594 रुग्ण समोर आले. त्यात सर्वाधीक अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 732, नगर ग्रामीण 463, श्रीगोंदा 425, संगमनेर 381, राहाता 315, राहुरी 287, कोपरगाव 277, श्रीरामपूर 247, पारनेर 230, शेवगाव 212, नेवासा 207, अकोले 187, कर्जत 180, पाथर्डी 132, इतर जिल्ह्यातील 126, जामखेड 106, भिंगार लष्करी परिसर 61, लष्करी रुग्णालय 18 व अन्य राज्यातील आठ रुग्णांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *