‘तीनबत्ती’ हल्ला प्रकरणी शहर पोलिसांचे हात अद्यापही रिकामेच! रात्रभर आरोपींची ओळख पटविण्याचे काम; शहरातील संघटनांकडून कारवाईसाठी निवेदनांचा ओघ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड नियमांची सक्ती करणार्‍या पोलिसांच्या पथकावर गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास संगमनेरातील तीनबत्ती चौकात मुस्लिम समाजाच्या जमावाने हल्ला चढवला होता. या गदारोळात तीन पोलीस कर्मचार्‍यांना दुखापतीही झाल्या. कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांवरच हल्ला झाल्याने त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण तालुक्यातून उमटू लागले आहेत. गुरुवारी रात्रीपासूनच सोशल माध्यमांमध्ये निषेधाचा महापूर आला असून लवकरात लवकर हल्लेखारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यात कायद्याचा धाक निर्माण करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आरोपींच्या शोधासाठी गुरुवारची संपूर्ण रात्र पोलिसांनी तीनबत्ती चाौकापासून कमल पेट्रोल पंपापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखारांची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दैनिक नायकला प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 25 ते 30 जणांची ओळखही पटविली असून लवकरच त्यांना गजाआड केले जाणार आहे. या घटनेने संगमनेर शहरातील वातावरण बिघडले असून अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी निवेदने देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

गुरुवारी (ता.6) सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास लखमीपुरा भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. यावेळी गस्तीवर असलेल्या अहमदनगर येथील स्ट्राईकिंग फोर्सच्या जवानांनी कोविड निसयमांकडे दुर्लक्ष करुन जमलेली गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने गर्दीतील काही टवाळखोरांनी जवानांशीच हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही समजदार नागरिकांनी मध्यस्थीही करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यादरम्यान मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाल्याने व पोलिसांची संख्या मर्यादीत असल्याने पथकाने तेथून काढता पाय घेत तिनबत्ती चौक गाठला. मात्र जमावातील अनेकांचे पूर्वग्रह दुषीत असल्याने त्यांनी पाठलाग करुन गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घेणार्‍या तिघा जवानांना घेरले व त्यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. यावेळी मोठ्या संख्येने हुल्लडबाज गोळा झाल्याने जवानांनी तेथून निघून जाणे पसंद केले.

एवढे होवूनही जमावाने त्यानंतर अंदाधुंद दगडफेक केली. यात अनेक खासगी प्रवासी वाहनांसह काही मालट्रकचेही नुकसान झाले. त्यानंतर जमावाने तिनबत्ती चौक ते कमल पेट्रोल पंपादरम्यान उभारलेले सर्व बॅरिकेट्स जमावाने फेकून दिले. यावेळी तिनबत्ती चौकातच निवार्‍यासाठी पोलिसांनी उभा केलेला तंबूही काही समाजकंटकांनी उध्वस्त करुन रस्त्यावर भिरकावून दिला. यावेळी दोघा दुचाकीस्वारांनी हुल्लडबाजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता जमावातील काही ‘गुंड’ त्यांच्याच अंगावर धावून गेल्याचे दृष्यही सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. या घटनेनंतर हुल्लडबाजांसह सगळा जमाव पांगला.

रात्री उशिराने संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी जावून तीनबत्ती चौकापासून ते कमल पेट्रोल पंपापर्यंतच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा शोध घेवून त्यांचे पाच डीव्हीआर ताब्यात घेतले. त्याच्या छाननीतून आत्तापर्यंत 25 ते 30 हल्लेखोरांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाल्याची माहिती दैनिक नायकच्या हाती लागली आहे. निष्पन्न झालेल्या आरोपींना स्वतःहून हजर करा असे आदेश उपअधिक्षक मदने यांनी मुस्लिम समाजातील पुढार्‍यांना बजावले असून स्वतःहून आरोपी हजर न झाल्यास ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून मोठ्या प्रमाणात धरपकड करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

गुरुवारी सायंकाळी हा प्रकार सुरू असताना त्याची माहिती संपूर्ण तालुक्यात वार्‍याच्या वेगाने पसरली. त्यामुळे शहरासह संपूर्ण तालुक्यातील वातावरणच गंभीर झाले होते. सोशल माध्यमात याबाबतचे काही व्हिडिओही व्हायरल झाल्याने नेटकर्‍यांमधून संताप व्यक्त होवून निषेधांचा महापूर वाहू लागला. आज सकाळी संगमनेर शहर शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख अमर कतारी, तुमसर मतदार संघाचे संपर्क प्रमुख नरेश माळवे व माजी नगरसेवक तथा भाजपाचे नेते शिरीष मुळे यांनी पोलीस उपअधिक्षक मदने व पोलीस निरीक्षक देशमुख यांना निवेदन देत धर्मांध प्रवृत्तीने केलेल्या या हल्ल्याचा निषेध करीत दोषी असलेल्या सर्व हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाईसह संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाईची मागणी करण्यात आली.

तर कुटुंब फौंडेशन या सामाजिक संघटनेने गणेशनगर परिसरात हातात काळे झेंडे घेवून रास्ता रोको आंदोलन करीत या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी हल्लेखारांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदनही देण्यात आले. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण तालुक्यातून संताप व्यक्त होत असून पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न सांभाळता कायद्याच्या रक्षकांवरच हल्ला चढवणारी प्रवृत्ती समूळ नष्ट करावी अशी मागणी होत आहे.

गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या गंभीर घटनेची माहिती घेण्यासाठी श्रीरामपूर उपविभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी आज सकाळी संगमनेरात भेट दिली. यावेळी त्यांनी मारहाण झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांची भेट घेवून नेमक्या प्रकाराची माहिती घेतली. पोलिसांनी लवकरात लवकर दोषी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांना अटक करावी असे आदेशही त्यांनी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना दिले. या घटनेने संपूर्ण तालुक्यातील वातावरण खराब झाले असून समाजमनामध्ये संताप खदखदत आहे. त्यामुळे अनेकांनी पोलीस अधिकार्‍यांची भेट घेवून कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. त्या अनुषंगाने शहरात आज रात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले जाण्याची दाट शक्यता आहे.

नागरिकांना कोविडचे संक्रमण होवू नये यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आपले जीवन संकटात घालून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. अशावेळी त्यांच्यावर हल्ला होणं आणि त्यांचा अपमान केला जाणं हे अतिशय दुर्दैवी आहे. खरेतर अशी घटना घडायलाच नको होती, मात्र काहींजणांनी त्याला हवा दिल्याने कालचा प्रकार घडला. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी असे माझे स्पष्ट मत आहे. बुधवारी घडलेला प्रकार मला अजिबात पटलेला नाही, सुसंस्कृत शहराचे वातावरण खराब करण्याचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही.
बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *