बेलापूर येथे नदीकाठावर कोरोना टेस्ट किट्सह साहित्य आढळले आरोग्य विभागाकडून शोध सुरू; पोलिसांत करणार गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
एकीकीडे कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेतली जात असताना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे वापरलेले कोरोना टेस्ट किट्सह अन्य साहित्य नदीकाठावर फेकून दिल्याचे आढळून आले. खासगी रुग्णालय किंवा लॅबचालकाने या साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता ते येथे उघड्यावर फेकून दिल्याचा संशय आहे. आरोग्य विभाग त्याचा शोध घेत आहे.

बेलापूर येथून वाहणार्‍या प्रवरा नदीच्या काठावर हा कचरा पडल्याचे आढळून आले. त्यामध्ये रॅपिड अँटीजेन टेस्टसाठीचे किट, सलाईन, हातमोजे, मास्क असे वापरलेले साहित्य आहे. नियमानुसार अशा कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात नदी काठावर ते उघड्यावर फेकण्यात आले होते. याची माहिती गावातील प्रा.अशोक बडदे यांना मिळाली. त्यांनी तेथे जाऊन खात्री केली आणि आरोग्य विभागाशी संपर्क केला. नदीवर मासेमारीसाठी अनेकजण येत असतात. तेथून जवळच स्मशानभूमी आहे. या परिसरात माणसांचा वावर असतो ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

याची माहिती मिळाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.देविदास चोखर व त्यांच्या सहकार्‍यांनी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. ज्या अर्थी या कचर्‍यात रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी वापरण्यात आलेल्या किट्स आहेत, त्यावरून हा कचरा कोणी तरी खासगी लॅबचालकाने फेकला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. हा कचरा योग्य पद्धतीने नष्ट करण्याच्या सूचना अधिकार्‍यांनी दिल्या आहेत. येथे कचरा फेकणार्‍याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. याशिवाय अशा पद्धतीने कोणीही उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ.चोखर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *