इंदोरीकर महाराजांच्या अडचणी पुन्हा वाढल्या! ‘अंनिस’ने औरंगाबाद खंडपीठात केली याचिका दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी पुत्रप्राप्तीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. कारण, संगमनेर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावर आता ‘अंनिस’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यानंतर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवून आठ आठवड्यानंतर सुनावणी ठेवली आहे.

‘सम तिथीला संबंध ठेवल्यास मुलगा होतो व विषम तिथीला मुलगी,’ असे वक्तव्य केल्यामुळे इंदोरीकर महाराज वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. याबाबत अनंसिच्या राज्य सचिव अ‍ॅड.रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर जिल्हा रुग्णालयाच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तेथे झालेल्या निर्णयानुसार इंदोरीकरांना संगमनेर ग्रामीण रुग्णालयामार्फत नोटीस देण्यात आली. त्यावर खुलासा करताना इंदोरीकरांनी हे आरोप फेटाळून लावले. मात्र, त्यानंतर तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सकांनी संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर भवर यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन संगमनेर न्यायालयाने अलीकडेच सुनावणी घेऊन इंदोरीकर महाराज यांची निर्दोष मुक्तता केली. यावेळी महाराजांच्यावतीने अ‍ॅड.के.डी.धुमाळ यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.

परंतु, एवढ्यावरच न थांबता अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने अ‍ॅड.रंजना गवांदे, अ‍ॅड.नेहा कांबळे व अ‍ॅड.जितेंद्र पाटील यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत इंदोरीकर महाराजांविरोधात पुन्हा याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी केले आहे. अंनिसच्या राज्यसचिव तथा याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या याचिकेमुळे आता इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. न्यायालयाने याचिका दाखल करुन घेत इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवत आठ आठवड्यानंतर सुनावणी ठेवली आहे. याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी पुत्रप्राप्तीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच वादात सापडले होते. अंनिसने अग्रणी भूमिका घेत प्रकरण लावून धरले होते. यावर अलिकडेच संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी महाराजांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, आता पुन्हा अंनिसने थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केल्याने महाराजांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आठ आठवड्यानंतर होणार्‍या सुनावणीकडे महाराजांच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *