नागरिक, यंत्रणा व काही डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने कोविड सर्वोच्च पातळीवर! पहिल्या लाटेतील कोविड योद्ध्यांचा ‘सेवाभाव’ हरपला; ग्रामसुरक्षा समित्यांचे कामही कागदावरच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या चाळीस दिवसांपासून कोविडची रुग्णसंख्या चढत्याक्रमाने एकामागून एक उच्चांक करीत असल्याने संगमनेर तालुक्यातील आरोग्य स्थिती अतिशय चिंताजनक अवस्थेत पोहोचली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर, औषधे आणि हे सर्व मिळविण्यासाठी रुग्णालयात खाटेची उपलब्धता अशा सगळ्याच गोष्टींची कमतरता भासू लागल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची धावपळ आता रोजच दृष्टीस पडत आहे. जिल्ह्यात सध्या कठोर निर्बंध असल्याचे सांगितले जात असले तरीही त्याचा फारसा परिणाम रोज समोर येणार्‍या रुग्णसंख्येवर अथवा रस्त्यावरील गर्दीवर झाल्याचे कोठेही दिसून येत नाही. त्यातच पहिल्या लाटेत सेवाभावाचा उमाळा फुटलेल्या काही शासकीय कर्मचार्‍यांचा भावही आता बदलल्याने सर्वत्र कोविडचीच हुकूमत अनुभवयास मिळत आहे. जे योद्धे आजही मनापासून कोविड विरोधातील लढाई लढत आहेत, त्यांच्याकडून वारंवार आवाहन, सूचना देवूनही नागरिकांचा ‘ताजी भाजी’, ‘हवा तसा किराणा’ आणि लक्षणांकडे दुर्लक्ष करुन घरगुती इलाज घेण्याचा अट्टाहास कोविडचे साम्राज्य अधिक गहिरे करीत आहे. काही नागरिकांची ही मानसिकता संपूर्ण तालुक्याचे आरोग्यच ‘व्हेंटीलेटरवर’ आणणारी ठरत असून सामान्य नागरिकांनी या गोष्टींचा अत्यंत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.

गेल्या मार्चपासून जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविडच्या दुसर्‍या संक्रमणाला सुरुवात झाली. मागील वर्षभरात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत पहिल्या लाटेतील संक्रमणाने अनेक चढउतार दाखवतांना नऊ महिन्यांच्या कालावधीत सरासरी प्रत्येक महिन्यात 668 रुग्ण या गतीने 6 हजार 15 नागरिकांना कोविडची लागण झाली. मात्र चालू वर्षातील पहिल्या चार महिन्यातच या स्थितीत आमुलाग्र बदल झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीच्या 59 दिवसांमध्ये संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या जवळपास रोडावली होती. या कालावधीत दररोज अवघे 14 रुग्ण या गतीने एकूण रुग्णसंख्येत 796 रुग्णांची भर पडली. मात्र याच कालावधीत राजकीय लोकांसह सामान्यांना कोविडचा विसर पडला. 15 फेब्रुवारीनंतर तर देशभरासह जिल्ह्यात आणि संगमनेरातही विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि पारिवारीक कार्यक्रमांचीच जणू रेलचेल दिसू लागली.

त्याचे दुष्परिणाम मार्चपासून दिसायला सुरुवात झाली. फेब्रुवारीत संक्रमणाच्या गतीत काही प्रमाणात वाढ झाली, मात्र ती चिंताजनक नव्हती. संपूर्ण फेब्रुवारीत तालुक्यात सरासरी 18 रुग्ण या वेगाने एकूण 495 रुग्ण समोर आले. तर 1 ते 15 मार्च या कालावधीत त्यात दुपटीहून अधिक वाढ होत सरासरी 41 या गतीने 615 रुग्ण आढळले. येथून पुढचा कालावधीत कोविड प्रादुर्भावासाठी अतिशय पोषक ठरल्याचेच आजवरच्या आकडेवारीतून अगदी स्पष्टपणे दिसून येते. 16 ते 31 मार्च या सोळा दिवसांत संक्रमणाच्या गतीत आणखी भर पडून ती सरासरी 67 झाली आणि तालुक्यात तब्बल 1 हजार 78 रुग्णांची वाढ होवून मार्च महिन्याने कोविड संक्रमणातील 1 हजार 919 ही सर्वोच्च रुग्णसंख्या गाठली. एकाच महिन्यात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने तालुका हादरला, मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे संक्रमणाचा जोर वाढतच राहीला.

1 ते 15 एप्रिल हा पंधरा दिवसांचा कालावधीत संगमनेरच्या आरोग्य व्यवस्थेची चाचपणी करणारा होता. या कालावधीत सरासरीचा वेग थेट 142 रुग्ण दररोज इतक्या प्रचंड गतीवर जावून पोहोचला. एप्रिलच्या पहिल्या 15 दिवसांतच मार्चमधील सर्वाच्च ठरलेली एकूण रुग्णसंख्या मागे पडली आणि तालुक्यात तब्बल 2 हजार 127 रुग्णांची भर पडली. नंतर पंधरा दिवसांत तर त्यात आणखी वाढ झाल्याने तालुक्यात केवळ रुग्णालयांमधील खाटाच नाही तर ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोविडवरील प्रभावी औषधांचाही तुटवडा निर्माण झाला.

याच कालावधीत राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू झाले, मात्र त्याचाही कोणताच परिणाम ना गर्दीवर झाला, ना कोविडच्या संक्रमणावर झाला आणि ना वाढत चाललेल्या रुग्णसंख्येवर. या पंधरा दिवसांतील संक्रमणाची सरासरी गती थेट 225 रुग्ण रोज या प्रचंड गतीवर गेली आणि अवघ्या एकाच महिन्यात तालुक्यात तब्बल 6 हजार 445 रुग्ण समोर आले. मे महिन्यातील पहिल्या तिनच दिवसांनी तर आणखी भितीदायक स्थिती असण्याची शक्यताच समोर आणली आहे. गेल्या तीन दिवसांत सरासरी तब्बल 349 रुग्ण दररोज या वेगाने तालुक्यात 1 हजार 47 रुग्ण आढळले आहेत. यातून मे महिन्यातही उच्चांकी रुग्ण समोर येणार असल्याचे स्पष्ट संकेतच मिळाले आहेत.

एकीकडे कठोर निर्बंध लागू केलेले आहेत, सार्वजनिक गर्दीची ठिकाणं, शासकीय व खासगी कार्यालयं बंद अथवा अगदी नगण्य उपस्थितीत सुरु आहेत. अत्यावश्यक सेवांसाठी वेळेच्या मर्यादाही घालण्यात आल्या आहेत. आणि सर्व गेल्या महिन्याभरापासून सुरु असूनही रुग्णसंख्या अजूनही आटोक्यात का येत नाही? असा भाबडा प्रश्न सामान्य नागरिकांना पडणे क्रमप्राप्तच आहे. त्याचेही निरीक्षण समोर आले असून दररोज ताजीभाजी घेण्यासाठी बाजारात होणारी सामान्य नागरिकांची गर्दी, रोजचा किराणा रोजच घेवू अशी भूमिका कोविडला पोषक ठरत आहे. सध्याच्या कोविडचा स्ट्रेन अतिशय जलद आहे, त्याचा संसर्ग हवेतूनही होत असल्याचेही काही तज्ज्ञांचे निरीक्षण समोर आल्याने त्याची दाहकताही अधोरेखीत झाली आहे. मात्र तरीही भाजी आणि किराणा बाजार घेण्यासाठी होणारी सामान्यांची गर्दी हटतच नसल्याने कोविडचे काम अधिक सोपे झाले आहे.

याशिवाय शासनाने ‘गृह विलगीकरण’ ही संकल्पना पूर्णतः बंद करुन ‘संस्थात्मक विलगीकरण’ सक्तिचे केले आहे. मात्र येथेही सावळा गोंधळ आहे. शासनाने आदेश काढले, जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढले आणि स्थानिक इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदारांनीही आदेश काढले. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणेतील अनेकांचा सेवाभावच आता संपुष्टात आल्याने या सर्व घटकांकडून बजावले गेलेले आदेश केवळ कागदावरच राहिले. ग्रामीण भागातील संक्रमणाची गती वाढण्यास हिच गोष्ट सर्वाधिक कारणीभूत ठरली आहे.

आपले वैयक्तिक संबंध जोपासण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामसुरक्षा समिती सदस्यांमधील अनेकजण नियमांना तिलांजली देत चक्क संक्रमित रुग्णांना हवे तिथे थांबण्यास मोकळीक देवू लागल्यानेच तालुक्याची कोविड स्थिती बिघडल्याचे समोर आले. या धांदलीत ग्राम सुरक्षा समितीचे अध्यक्षपद असलेल्या एका सरपंचानेच दिवसभर आपले कुटुंब संस्थात्मक विलगीकरणात ठेवून संध्याकाळी घरी नेल्याचेही वृत्त दैनिक नायकच्या हाती आले. आता जर संक्रमित रुग्णालाच विलगीकरणात ठेवले जात नसेल, तर त्याचा संपर्क शोध कोण घेणार? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे, मात्र त्याच्या उत्तरात दुसर्‍या लाटेची दाहकता आहे हे सुद्धा वास्तवच आहे.

केवळ यंत्रणेतील काही घटकच नाही तर अनेक उच्चभ्रू, सुशिक्षित आणि जाणत्या लोकांसह ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणार्‍या काही डॉक्टरांनीही तालुक्याची कोविड स्थिती अनियंत्रित होण्यास हातभार लावला आहे. आजही अनेकजण परस्पर अथवा कोणा डॉक्टरांच्या चिठ्ठीने ‘एचआर-सिटी’ (स्कॅनिंग) तपासणी करतात आणि स्कोर शून्य आहे म्हटल्यावर ‘आरटीपीसीआर’ द्वारे स्राव तपासणी न करताच त्याच डॉक्टरांच्या सल्ल्याने परस्पर घरच्या घरी उपचारही घेतात आणि गावभर बोंबट्या मारीत अनेकांना बाधाही निर्माण करतात. तर अनेकजण लक्षणे दिसत असतानाही आपल्याला कोविड होवूच शकत नाही अशा अविर्भावात स्वतःच डॉक्टर होवून मेडिकलमधून गोळ्या घेतात, आणि कोविडला आपला जीव घेण्याची संधी स्वतःच निर्माण करुन देतात. यामुळेही कोविडच्या दुसर्‍या संक्रमणात मृत्यूदर वाढल्याचे निरीक्षणही समोर आले आहे.

याशिवाय ग्रामीण भागातील अनेक डॉक्टर्स ‘आलेला रुग्ण एक संधीच आहे’ असं समजून त्याच्यावर भलतेच उपचार करुन त्याला बरे करण्याचा प्रयत्न करतात, सलाईन लावतात आणि चार/सहा दिवस त्याला स्थानिक पातळीवरच ठेवतात. त्यातून संबंधित रुग्णांच्या फुफ्फुसातील संसर्ग संपूर्ण छातीलाच विळखा घालतो, मग रुग्ण अत्यवस्थ होवू लागताच संबंधित डॉक्टर कोविडचा संशय व्यक्त करुन त्याला शहरात घेवून जाण्याचा सल्ला त्याच्या नातेवाईकाला देतात. पण तोपर्यंत संबंधित रुग्ण हाताबाहेर गेलेला असतो, त्याला थेट ऑक्सिजनची गरज निर्माण होते. त्याच्या नशिबाने त्याला ऑक्सिजनची सुविधा असलेली खाट मिळाली तर जगला, नाहीतर त्याची वाट लागलीच अशी आजची स्थिती आहे. यासर्व गोष्टी समजूनही आणि प्रशासनाकडून, माध्यमांकडून वारंवार सांगीतले जावूनही सामान्य माणूस आणि काही लालची डॉक्टर्स पैशांच्या गर्तेतून बाहेरच पडत नसल्याने तालुक्यातील संक्रमण सध्या भरात असून मृतांची संख्याही धक्क्यामागून धक्के देत आहे.


बाधित रुग्णाला तत्काळ उपचार, त्याच्या संपर्काचा शोध, लक्षणे नसलेल्या रुग्णांचे सक्तीने ‘संस्थात्मक विलगीकरण’ या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे होत असलेले दुर्लक्ष, ‘एचआर-सिटी’ (स्कॅनिंग) करुन परस्पर उपचार घेणार्‍यांची संख्या, त्यांना झाकणारे काही डॉक्टर्स, लक्षणे अथवा त्रास नसलेल्या काही रुग्णांचा गावभर अर्निबंध वावर आणि त्यात भर म्हणून स्थानिक पातळीवरील डॉक्टरांकडून कोविड रुग्णांवर सुरु असलेले भलतेच उपचार आणि सलाईनचा मारा यामुळे संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील कोविडची स्थिती अनियंत्रित अवस्थेत पोहोचली आहे. त्याचा परिणाम मृत्यूदरातही विलक्षण वाढ झाली असून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या सूत्राचा विसर पडल्याने अनेक नागरिक आपल्याच कुटुंबाचे जीवन धोक्यात आणीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *