पालिकेचे कोविड सेंटर झाले ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’! नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या पुढाकारातून मिळतोय बारा रुग्णांना ‘ऑक्सिजन’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील वाढत्या कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीणभागातील अनेक ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात आहे. मात्र संगमनेर नगर पालिकेने पहिल्या लाटेतच कॉटेज रुग्णालयातील जॉन.एफ.केनडी यांच्या नावाने असलेल्या हॉलमध्ये चाळीस खाटांची व्यवस्था केली होती. मात्र दुसर्‍या संक्रमणात विलगीकरणापेक्षा उपचाराधीन रुग्णांची संख्या अधिक असल्याने नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या पुढाकारातून पालिकेने आहे त्याच ठिकाणी सद्यस्थितीत बारा ऑक्सिजन खाटांची व्यवस्था केली असून शहरी गरजू रुग्णांना त्याचा मोठा लाभ होत आहे. मात्र त्याचवेळी शासनाकडून कोणताही औषध पुरवठा होत नसल्याने दाखल असलेल्या रुग्णांना औषधे आणि जेवणाची सोय स्वतालाच करावी लागत आहे.

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविडचे संक्रमण प्रचंड भरात आहे. कोविडच्या दुसर्‍या लाटेत गंभीर अवस्थेतील रुग्णांचा अधिक भरणा असल्याने अशा रुग्णांना ऑक्सिजनची खाट मिळणे आवश्यक बनले आहे. संगमनेर तालुक्यात एकूण 48 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स असून या सर्व ठिकाणी मिळून 600 ऑक्सिजन खाटांची आणि सुमारे 45 व्हेंटीलेटरची व्यवस्था आहे. मात्र सध्याच्या संक्रमणाची गती आणि गंभीर अवस्थेतील रुग्णांची संख्या लक्षात घेता तालुक्यात ऑक्सिजन बेडच शिल्लक नाहीत. विशेष म्हणजे आजच्या स्थितीत तालुक्यातील 1 हजार 300 हून अधिक रुग्ण सक्रीय संक्रमित असून त्यातील निम्म्याहून अधिक जणांवर जेथे खाट मिळाली तेथे उपचार सुरु आहेत. ज्यांना खाट मिळविण्याच्या स्पर्धेत अपयश आले त्यांना आपले जीवही गमवावे लागले आहेत.

वाढत्या संक्रमणात आरोग्य यंत्रणा तोकडी ठरु लागल्याने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने विघ्नहर मंगल कार्यालयात पाचशे खाटांचा विलगीकरण कक्ष सुरु केला आहे. सध्याच्या स्ट्रेनमध्ये ऑक्सिजनची गरज भासणार्‍या रुग्णांची संख्या अधिक असल्याने पुढचा विचार करुन कारखाना व्यवस्थापनाने विघ्नहर कार्यालयातील पाचशे खाटांचे रुपांतर ऑक्सिजन खाटांमध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी ऑक्सिजन प्रकल्पही उभा करण्याचे काम सुरु आहे. लवकरच हा प्रकल्प सुरु होवून तालुक्यातील नागरिकांसाठी पाचशे खाटांची व्यवस्था सज्ज होईल अशी सामान्यांना अपेक्षा आहे.

याच पार्श्वभूमीवर पूर्वी ग्रामीण रुग्णालयाचा भाग असलेल्या पालिकेच्या प्रांगणातील कॉटेज रुग्णालयातही बरेच बदल करण्यात आले आहेत. पूर्वी या रुग्णालयातील जॉन.एफ.केनडी हॉलमध्ये ‘जनरल वॉर्ड’ होता. या वॉर्डमध्ये 14 ऑक्सिजनच्या खाटाही होत्या. कालांतराने येथील रुग्णालय घुलेवाडीला हलविण्यात आले, मात्र ज्या व्यवस्था करुन ठेवलेल्या होत्या त्या तशाच राहील्या. आजच्या भयानक स्थितीत त्याचे स्मरण झाल्याने पालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि चौदा पैकी बारा ऑक्सिजन पॉईंट पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची गरज भासणार्‍या शहरी भागातील रुग्णासाठी ही गोश्ट दिलासा देणारी ठरत आहे.

सध्या पालिकेच्या आवारातील केनडी हॉल व अन्य वास्तुमध्ये एकूण 38 रुग्णांच्या विलगीकरणाची व्यवस्था आहे. त्यातील बारा खाटांना आता ऑक्सिजनचा पुरवठा सुरु असून आजच्या स्थितीत या बाराही खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास डॉक्टर्स, परिचारिका व अन्य कर्मचारीही तैनात आहेत. आणीबाणी सदृष्यकाळात पालिकेने उभ्या केलेल्या या सुविधेचा संगमनेरकर गरजू रुग्णांना खूप फायदा होत असल्याचे दिलासादायक चित्र सध्या दिसत आहे. येथील ऑक्सिजन खाटांची संख्या आणखी वाढवण्यासही मोठा वाव असल्याने पालिकेने कोविडचा पुढचा प्रवास लक्षात घेवून त्यादृष्टीने व्यवस्था करण्याचीही अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र सध्यातरी कोविड केअर सेंटरचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये रुपांतर झाल्याने नागरिक समाधानी आहेत.


संगमनेर नगर पालिकेने सुरु केलेल्या डिसीएचसीचा संगमनेरकरांना निश्चितच मोठा फायदा होत आहे. मात्र येथे उपचाराधीन असलेल्या रुग्णांना अद्यापही औषधांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे उपचार करणारे डॉक्टर रुग्णांनाच औषधे आणि जेवणाची व्यवस्था करायला सांगतात. ज्यांचे नातेवाईक दिवसातून दोन-चार चकरा मारतात त्यांचे ठिक आहे, पण येथे असेही नागरिक आहेत ज्यांचे नातेवाईकच येत नाहीत. त्यांच्या जेवणाचेही हाल होत आहेत, आणि त्यांना आपली औषधे आणण्यासाठी स्वतः बाहेरही यावे लागत आहे, ही गोष्ट अत्यंत गंभीर असून यावर पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *