वांबोरीमध्ये विलगीकरणात असलेले रुग्ण गायब? प्रशासन अनभिज्ञ राहिल्याने नागरिकांतून व्यक्त होतेय चिंता

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी ‘गाव तिथे गृहविलगीकरण’ अशी संकल्पना राबविण्यात आली आहे. मात्र, वांबोरी येथे ही संकल्पनाच कुचकामी ठरली आहे. वांबोरी गावामध्ये महेश मुनोत विद्यालयात गेल्या आठ दिवसांपासून बाधित रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली. मात्र, या सेंटरमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके असलेले रुग्णही दोन तासानंतर गायब झाल्याने गौडबंगाल वाढले आहे. हे सर्व रुग्ण नेमके गेले तरी कुठे? याबाबत दस्तुरखुद प्रशासनच अनभिज्ञ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वांबोरीतील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

महेश मुनोत विद्यालयामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी तीन ते चार रूग्ण दाखल झाले होते. त्यांच्या देखभालीसाठी या ठिकाणी चार ते पाच कर्मचारी तेथे रात्रंदिवस काम करीत आहेत. परंतु हे रुग्ण ज्या दिवशी दाखल झाले, त्याच दिवशी दोन तासांत पुन्हा या ठिकाणाहून निघून गेले आहेत. आठ दिवसात शंभर रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघत असतील तर राहुरी महसूल विभाग, आरोग्य विभाग व पोलीस खाते नेमके करते तरी काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

मागील वर्षी करोनाची लाट आली त्यावेळी तहसीलदार व पोलीस प्रशासन यांनी मात्र जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांना जबरदस्तीने गृह विलगीकरण केले होते. त्यामध्ये चुकून एखादा रुग्ण बाधित सापडत होता. मात्र, यावेळी कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सुद्धा प्रशासन मूग गिळून बसल्याने ठोस कारवाई करीत नसल्याने रुग्ण वाढत असल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. अशातच वांबोरीमध्ये या योेजनेला खीळ बसल्याने आता राहुरी तालुक्यातील कुठल्याही गावांमध्ये कोरोनाला आळा बसेल की नाही? असा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने आपले कर्तव्य बजावले तर आठ दिवसांत कोरोना राहुरी तालुक्यातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नसल्याचे ज्येष्ठ नागरिक बोलत आहेत. आता तरी आरोग्य खाते, महसूल विभाग व पोलीस खाते जनतेचा जीव वाचविण्यासाठी पुढे येतील की नाही? अशी शंका ज्येष्ठ नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये बळींची संख्याही मोठी आहे. अनेक गोरगरीबांचे कर्ते माणसं यात बळी गेले असल्यामुळे त्यांचे प्रपंच उघड्यावर पडलेले आहेत. हे सर्व सावरण्यासाठी महसूल विभाग, आरोग्य खाते व पोलीस प्रशासन जागे होईल का? अशी सवाल नागरिकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *