शेवगावसाठी चिलेखनवाडीचा प्राणवायू प्रकल्प ठरतोय संजीवनी नियमितपणे 120 सिलेंडरचा होतोय पुरवठा; भटकंती थांबली

नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येला ऑक्सिजन पुरवण्यासाठी शेवगाव नजीकचा चिलेखनवाडी येथील ऑक्सिजन प्लॅन्ट संजीवनी ठरत असून तेथून नियमित मिळणार्‍या दैनंदिन 120 सिलिंडरमुळे शेवगाव तालुक्यातील हॉस्पिटल व रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा होत आहे. इतर शहरात ऑक्सिजनसाठी रुग्णांचे नातेवाईक व हॉस्पिटल प्रशासनाची धावपळ पाहता शेवगावकरांच्या मदतीला चिलेखनवाडी येथील लोचनबाई पुरी ऑक्सिजन इंडस्ट्रीज धावून आली आहे.

शेवगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यात 3781 वर पोहोचली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी उपचार करणार्‍या आठ रुग्णालयात आय.सी.यू.-21, व्हेंटीलेटर-4, ऑक्सिजन 110, आयसोलेशन-65 अशी बेड संख्या उपलब्ध आहे. तर शासकीय, विविध संस्था व पदाधिकार्‍यांनी सात ठिकाणी सुरु केलेल्या कोविड सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या बाधित रुग्णांसाठी 650 बेड उपलब्ध आहेत. या दोन्ही ठिकाणी तालुक्यातील बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच अतिगंभीर रुग्ण मोठ्या शहरामध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तालुक्यातील रुग्णांसाठी लागणार्‍या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा शेजारच्या नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील पुरी ऑक्सिजन इंडस्ट्रीजमधून केला जातो. तेथून नियमित 120 सिलेंडर उपलब्ध होत असल्याने तालुक्यातील उपचार घेणार्‍या नातेवाईकांची व रुग्णालयांची ऑक्सिजनसाठी होणारी भटकंती थांबली आहे. इतर शहरातील ऑक्सिजन पुरवठ्याची परिस्थिती गंभीर असताना शेवगाव पासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर असलेल्या या प्लॅन्टने शेवगावला खर्‍या अर्थाने प्राणवायू पुरवून शेजार धर्माची जाणीव करुन दिली आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील इतर शहरांचा व रुग्णालयांचा भार या प्लॅन्टवर टाकण्यात आला असला तरी शेवगावकरांना मात्र संचालक बजरंग पुरी यांनी त्याची कधी उणीव भासून दिली नाही.

तालुक्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी गंभीर परिस्थितीत प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार अर्चना भाकड, नायब तहसीलदार मयूर बेरड, गटविकास अधिकारी महेश डोके, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामेश्वर काटे विशेष दक्ष आहेत. प्रसंगी चिलेखनवाडी येथील प्लॅन्टवर जावून स्वत: ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी अधिकार्‍यांची मदत होत असल्याने तालुक्यातील रुग्णांसाठी ते देवदूत म्हणून काम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *