किरकोळ कारणावरुन ‘प्रतिबंधित क्षेत्रात’च दोन गटात तुफान फ्रि स्टाईल! परस्पर विरोधी तक्रारीवरुन पंचवीस जणांवर गुन्हा; प्राणघातक शस्त्रांचाही वापर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावाने वातावरण धीरगंभीर झालेले असतांना चक्क कंटेन्मेंट झोनमध्येच (प्रतिबंधित क्षेत्र) दोन गटात तुफान हाणामार्‍या होण्याची धक्कादायक घटना रविवार समोर आली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांवर दंगलीसह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले असून प्राणघातक शस्त्र बाळगणार्‍या गटावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. या वृत्ताने संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता.2) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील अकोले नाका परिसरात सदर प्रकार घडला. या प्रकरणी योगेश मनोहर सूर्यवंशी याने पहिली फिर्याद दाखल केली असून त्यानुसार फिर्यादी व त्याचे वडील मयत आजीच्या दशक्रिया विधीचा फलक लावीत असतांना त्याचा राग आल्याने अतुल मेघनाथ सूर्यवंशी, सिद्धार्थ संपत सूर्यवंशी, परिघा सहादू सूर्यवंशी, आकाश दिनकर माळी, मेघनाथ सहादू सूर्यवंशी, विघ्नेश मेघनाथ सूर्यवंशी, संपत सहादू सूर्यवंशी, उज्ज्वला संपत सूर्यवंशी, मथुरा सहादू सूर्यवंशी, पूनम नवनाथ माळी, आदित्य संपत सूर्यवंशी, मीना गणेश माळी, रुपा दिनकर माळी, अनिता दिनकर माळी व गणेश दशरथ माळी या सोळा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमा करुन हातात काठ्या, लोखंडी पाईप, लोखंडी कत्तीसह फिर्यादी, त्याचे वडिल मनोहर, आई अरुणा, भाऊ सचिन सूर्यवंशी अशांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच फिर्यादीच्या घरावर दगडं फेकून घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीचे नुकसान केले.

यापक्ररणी दाखल तक्रारीवरुन पोलिसांनी वरील सोळा जणांविरोधात भा.दं.वि. कलम 452, 143, 144, 147, 148, 337, 427, 323, 504, 506 सह भारतीय शस्त्रास्त्र कायद्याचे कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. तर दुसरी तक्रारी परिघा सहादू सूर्यवंशी यांनी दाखल केली आहे. त्यानुसार योगेश मनोहर सूर्यवंशी, सागर मनोहर सूर्यवंशी, सचिन मनोहर सूर्यवंशी, विनोद मनोहर सूर्यवंशी, उमेश मनोहर सूर्यवंशी, शिवानी योगेश सूर्यवंशी, शोभा मनोहर सूर्यवंशी, अरुणा मनोहर सूर्यवंशी व मनोहर बाबुराव सूर्यवंशी या सर्वांना पहिल्या गटातील आदित्य संपत सूर्यवंशी याने ‘तुमच्या घरातील सर्व लोक कोविड संक्रमित आहेत, तुम्ही जास्त गर्दी करु नका’ असे म्हणाल्याचा राग आल्याने त्यांनी काठ्या घेवून फिर्यादी व फिर्यादीचे भाचे आदित्य व सिद्धेश यांना मारहाण करुन पूनम माळी हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण व दमबाजी केल्याची तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी वरील नऊ जणांवर भा.दं.वि. कलम 143, 144, 147, 148, 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या या परिसरात दोन गटांत किरकोळ बाचाबाची सुरु होती. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा उद्रेक होवून दोन गटात थेट धुमश्चक्री झाली. यावेळी एका गटाकडून जीवघेण्या शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापरही करण्यात आला. पहिल्या गटाने दुसर्‍या गटाच्या घरांवर दगडफेकही केल्याने काहीकाळ अकोले नाका परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात झालेल्या या धुमश्चक्रीने मात्र संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *