संगमनेर तालुक्यात शंभरातील चौतीस जणांना होत आहे संक्रमण! ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाला साथ देण्याचे तहसीलदार अमोल निकम यांचे आवाहन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नववर्षाच्या सुरुवातीपासूनच कोविडच्या संक्रमणाकडे शासन, प्रशासन आणि नागरिकांचे दुर्लक्ष झाल्याने त्याचे दुष्परिणाम सध्या संपूर्ण देश भोगत आहे. कोविडच्या या दुसर्‍या लाटेतील संक्रमणाची गती आणि त्याचे परिणाम अधिक घातक असल्याचे समोर येवूनही जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी उडणार्‍या झुंबडी आणि लक्षणे दिसूनही घरगूती अथवा पारिवारीक डॉक्टरांकडून परस्पर उपचार घेण्याच्या पद्धतीमुळे संक्रमणाची गती वाढण्यासोबतच गंभीर रुग्णांची संख्याही वाढत असल्याने सर्वत्र विदारक चित्र निर्माण झाले आहे. यासर्व गोष्टींचे दुष्परिणामही तितक्याच ठळकपणे समोर येत असून सध्या तालुक्याच्या संक्रमणाची गती वाढून थेट शंभरातील तब्बल 34 जणांना कोविडची लागण होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नामदार बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार तालुक्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत सर्वेक्षणाची मोहीम सुरु केली असून नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी दारात येणार्‍या पथकांना वस्तुनिष्ठ माहिती देण्याचे आवाहन संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.

राज्यासह जिल्ह्यात सध्या कोविड संक्रमणाची दुसरी लाट उसळली आहे. त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत. त्यातही ऑक्सिजन अथवा कृत्रिम प्राणवायुची गरज असलेल्या रुग्णांचाच भरणा अधिक असल्याने राज्यासह जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर पत्रकार मंचने रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील कोविडची सद्यस्थिती, संक्रमण वाढीच्या गतीमागील कारणं, उपलब्ध रुग्णालये आणि ऑक्सिजनसह औषधांची स्थिती याबाबत नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह संगमनेरातील पत्रकारांनी याबाबत आपापले अभ्यासपूर्ण निरीक्षण सादर करतांना नागरिकांच्या सुरक्षिततेची कामना करतांनाच नियमांचे पालन का करावे याबाबतच अधिक स्पष्टता करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलतांना तहसीलदार अमोल निकम यांनी कोविड संक्रमणाचा उच्चांक ठरलेल्या एप्रिल महिन्यातील वस्तुस्थिती मांडतांना सांगीतले की, पूर्वी पेक्षा तालुक्यातील संक्रमणाची गती तब्बल 14 टक्क्यांनी वाढली असून गेल्या महिन्याभरात हा वेग शंभरात 34 इतका प्रचंड आहे. एप्रिलमध्ये प्रशासनाने 18 हजार 858 जणांचे स्राव नमुने घेवून त्याची तपासणी केली असता त्यातील तब्बल 6 हजार 445 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले. महिन्याच्या शेवटच्या आठवड्याची गती तर याहूनही अधिक असल्याने कठोर निर्बंध लागू असतांनाही नागरिकांकडून कोविड नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. सध्याच्या स्थितीत तालुक्यातून दररोज सरासरी 215 रुग्ण समोर येत असल्याने व त्यातच त्यातील बहुतेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण प्रचंड वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविड विरोधातील लढाई केवळ आरोग्य यंत्रणा, पालिका, पोलीस, महसूल अथवा पंचायत समितीपूरती मर्यादीत नसून त्यासाठी समाजातील सर्वच घटकांचा सहभाग अतिशय गरजेचा आहे. प्रत्येकाने शासन आणि प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केल्यास अनियंत्रित होत असलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आणता येईल. अन्यथा तालुक्यातील कोविडची स्थिती आणखी भयानक होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या होवूनही व रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणूनही रुग्णसंख्या आटोक्यात का येत नाही या प्रश्नावरही तहसीलदार निकम यांनी नेमके भाष्य केले. एखाद्याला कोविडची लक्षणे जाणवू लागली की असा संशयीत रुग्ण स्वतःच त्याचे निदान करुन परस्पर औषधे घेतो. त्यामुळे त्याला एकदोन दिवस बरेही वाटते, पण नंतर मात्र तिच लक्षणे उफाळून समोर येतात. त्यानंतरही अनेकजण कोविडची चाचणी करुन उपचार घेण्याऐवजी आपल्या कौटुंबिक डॉक्टरांकडे जातात, तेथेही त्यांना अपूर्ण माहिती देवून वेगळ्याच संसर्गाचे कारण सांगून सलाईन घेवून वा अन्य औषधे घेवून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करतात.

या दरम्यानच्या काळात शरीरातील कोविडचा संसर्ग अधिक पसरुन अशा रुग्णांना श्वास घेण्यास अडथळे निर्माण होण्यास सुरुवात होते. या कालावधीत त्याला कोविडचे उपचारच मिळालेले नसल्याने रुग्ण गंभीर होतो आणि मग त्याच्या नातेवाईकांची आणि मित्र मंडळींची ऑक्सिजनची खाट शोधण्यासाठी धावपळ सुरु होते असा घटनाक्रमच तहसीलदार निकम यांनी मांडला. नागरिकांच्या या निष्काळजीपणामुळेच एप्रिलमध्ये तालुक्यात कोविडचा प्रचंड उद्रेक झाल्याचे त्यांनी सांगीतले. नागरिकांनी कुटुंबातील कोणालाही कोविडसदृष्य लक्षणे दिसल्यास ‘तो कोविड संक्रमित’ आहे असे समजूनच तत्काळ त्याच्या चाचण्या करुन उपचार घेण्याची गरज आहे. प्रत्येक कुटुंबाने या एकाच गोष्टीचे पालन केल्यास वाढत चाललेली रुग्णसंख्या आणि सध्या वाढलेला मृत्यूदर नियंत्रणात आणला जावू शकतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोविडच्या पहिल्या संक्रमणात सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या अधिक होती. मात्र सध्याचे संक्रमण अधिक घातक असून संक्रमण झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला थेट अत्यवस्थ अवस्थेत ऑक्सिजन द्यावा लागत असल्याचे वास्तवही त्यांनी काही उदाहरणांसह मांडले. सध्या तालुक्यातील 48 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांमधील बहुतेक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे केवळ संगमनेरातच नव्हे तर संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आजच रुग्णांना खाटा मिळत नाहीत अशी उदाहरणे ठिकठिकाणांहून समोर येत आहेत. उद्या संक्रमणाची गती आणखी वाढल्यास काय अवस्था निर्माण होईल याचा अतिशय गांभिर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही तहसीलदार निकम म्हणाले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने संगमनेर तालुक्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण सुरु केल्याचे त्यांनी सांगीतले. आपल्या घरी येणार्‍या कर्मचार्‍यांना कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती, त्यांचे आजार इत्यादी विषयी अचूक माहिती दिली तरीही संक्रमणाचे वाढते आकडे नियंत्रणात आणता येतील, मात्र त्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगीतले. प्रशासन सध्या रुग्णाचा तत्काळ शोध घेवून त्याला उपचार देण्यासाठीही प्रयत्न करीत आहे. मात्र संक्रमणाची गती अशीच वाढती राहीली तर रुग्णालयांमध्ये जागा मिळणे अवघड होईल. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखूनच आपली भूमिका पार पाडली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


सध्या तालुक्यातील 48 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये 1 हजार 400 रुग्णांवर उपचार सुरु असून जिल्हा प्रशासन व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सहकार्याने या रुग्णांना आवश्यक असलेला 10 ते 12 मेट्रिक टन ऑक्सिजन आपण चाकण येथून उपलब्ध करीत आहोत. जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यात सात ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले असून घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात या प्रकल्प उभारणीचे कामही सुरु असून येत्या पंधरा दिवसांत त्याद्वारे सुमारे सव्वादोन मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल, मात्र त्याचा वापर फक्त ग्रामीण रुग्णालयासाठी होणार असल्याचेही तहसीलदार निकम यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी मोठ्या खासगी रुग्णालयांनीही यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.

जिल्ह्यात कठोर निर्बंध असूनही अनेक नागरिकांना अजूनही त्याचे गांभीर्य समजलेले नाही. जिल्हाधिकार्‍यांनी दुचाकीवरुन दोघांना प्रवास करण्यास मनाई केली असूनही अनेकजण अजूनही आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर आम्ही कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे संक्रमणाचा वेग इतका मोठा असूनही काही ठिकाणी नियम धुडकावून भाजी बाजार भरतो आहे, आणि नागरिकही कोविडला विसरुन तेथे गर्दी करीत आहेत. हा प्रकार अत्यंत विदारक असून आम्ही असे भाजी बाजार उठवून देण्याची कारवाई केली आहे, मात्र पुन्हा बाजार भरल्यास अथवा एकाच ठिकाणी बसून कोणी भाजी विक्री करीत असल्याचे आढळल्यास आता कठोर कारवाई करणार आहोत. नागरिकांच्याच सुरक्षेसाठी संपूर्ण प्रशासन काम करीत आहे, त्यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे वारंवार दुर्लक्ष होत असेल तर पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागेल.
– मुकुंद देशमुख
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर

One thought on “संगमनेर तालुक्यात शंभरातील चौतीस जणांना होत आहे संक्रमण! ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाला साथ देण्याचे तहसीलदार अमोल निकम यांचे आवाहन..

  • May 3, 2021 at 11:58 am
    Permalink

    अशा प्रकारे घोषणा, आवाहन करून काही साध्य होईल असे काही वाटत नाही, त्यासाठी आवश्यक ती कठोर कारवाई विनाविलंब सुरू केली पाहिजे. आदेश कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत त्वरीत यावयास हवे, अन्यथा खुप उशिर झालेला असेल.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *