अकोलेत सव्वा दोन कोटीचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ः डॉ.लहामटे ग्रामीण रुग्णालयात उभारणार; तालुक्यात बेडसह पुरेसा औषधांचा साठाही उपलब्ध

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोलेत 2 कोटी 27 लाखांचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारल्यानंतर ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग सेंटर प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये साकारणार आहे. भविष्यात येथे उपजिल्हा रुग्णालय होणार असून त्यासाठी ऑक्सिजन प्लांट उपयोगी पडेल, असे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी स्पष्ट केले.

ऑक्सिजन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट करत शनिवारी (ता.1) त्यांनी अकोले शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभिरे, नोडल अधिकारी डॉ.श्याम शेटे, डॉ.अजित नवले, सुरेश गडाख, भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे, चंद्रभान नवले, महेश नवले, प्रदीप हासे, नितीन गोडसे, सचिन शेटे, राजेंद्र सदगीर, बाळासाहेब आरोटे यावेळी उपस्थित होते.

तालुक्यात कोविड केअर केंद्रात 850 बेड असून, सध्या 650 सक्रिय कोविड रुग्ण असून 200 रुग्ण संगमनेर, नाशिक व अहमदनगर येथे सोयीनुसार उपचार घेत आहेत, अकोलेत बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजन बेडची कमतरता भरून काढण्यासाठी तालुक्यातील सर्व गुरुजन शिक्षक व सर्वपक्षीय कार्यकर्ते सक्रीय योगदान देत आहेत. सुगाव येथे शिक्षकांच्या पुढाकाराने 60 ऑक्सिजन बेडचे कोरोना सेंटर सुरू होत आहे. राष्ट्रवादी, भाजप, सेना, काँग्रेस अशा सर्वांचे सहकार्य मिळत आहे. तालुक्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा कोविड परिस्थिती सक्षमपणे हाताळत आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेने अकोलेची सरकारी आरोग्य यंत्रणी चांगली आहे. माझ्या घरात आईसह तीन कोरोना पेशंट होते. सरकारी यंत्रणेमुळे ते लवकर बरे झाले. नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी कोविड सेंटरमध्ये सुरक्षित उपचार घ्यावेत. घरीच उपचार घेत थांबू नका. वेळेत कोरोना सेंटरमध्ये दाखल व्हा. सोशल मीडियावर राळ उठविण्यापेक्षा प्रशासनाच्या चुका लक्षात आणून द्या. मग आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करता येतील. तालुक्यात बेड, औषध साठा शिल्लक असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही आमदार डॉ.लहामटे यांनी केले आहे.


गावोगावी जिल्हा परिषदांच्या शाळांत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आलेले आहे. कोविड ग्राम सुरक्षा समित्या सक्षम करण्यात आल्या असून, नियम पाळले नाही तर फौजदारी गुन्हे दाखल होतील.
– मुकेश कांबळे (तहसीलदार, अकोले)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *