महाराष्ट्र दिनी जिल्ह्यात कोविडचा अक्षरशः उद्रेक! संगमनेर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी रुग्ण; शहरी रुग्णसंख्येतील घट मात्र दिलासादायक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

राज्याच्या स्थापनादिनीच अहमदनगर जिल्ह्यात कोविडचा प्रचंड उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. आज जिल्ह्यातील सर्वात उच्चांकी तब्बल 4 हजार 219 इतकी रुग्ण संख्या आढळली आहे. आजच्या अहवालातही अहमदनगर पाठोपाठ संगमनेर तालुक्यात संक्रमणाचा कहर झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या महिन्याभरात संगमनेर तालुक्यात जवळपास साडेसहा हजार रुग्ण समोर आले आहेत. आजचा रुग्णवाढीने चालू महिन्यातही ही श्रृंंखला कायम राहण्याचे संकेत मिळाले आहेत. तालुक्याच्या आजच्या एकूण अहवालात संगमनेर शहरातील 86 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या आता 15 हजार 552 झाली आहे.

गेल्या संपूर्ण महिन्यात दररोज एकमेकांशी स्पर्धा करणारी रुग्णवाढ झाल्याने जिल्ह्यातील कोविडची स्थिती भयानक झाली आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णवाढीने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांंवरील ताण वाढला आहे. त्यातच ऑक्सीजनसह रेमडेसिवीर लस व फेबी फ्ल्यू या औषधांची कमतरता यामुळे राज्यासह जिल्ह्यातील कोविडचे संकटही अधिक गहिरे झाले आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे रुग्णांना ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध होत नसल्यानेही अनेक रुग्णांचे जीव गेले आहेत. आजही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. मात्र संक्रमणातील गती दररोज वाढतच असल्याने जिल्ह्यात आता सक्रिय रुग्णांची संख्या मोठं संकट ठरण्याची भिती निर्माण झाली आहे.
आजही जिल्ह्यात विक्रमी रुग्ण समोर आले असून त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रात 817, नगर ग्रामीण 476, संगमनेर 377, राहाता 355, श्रीगोंदा 263, कोपरगाव 257, श्रीरामपूर 252, पारनेर 248, राहुरी 243, नेवासा 206, पाथर्डी 163, इतर जिल्ह्यातील 132, जामखेड 126, अकोले 117, शेवगाव 82, भिंगार लष्करी परिसर 63, कर्जत 36, इतर राज्यातील 5 आणि लष्करी रुग्णालयातील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे.
जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील संक्रमणातही गेल्या महिन्याभरात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या संपूर्ण वर्षभरातील सर्व उच्चांक मोडित एकट्या एप्रिल महिन्यात तालुक्यात तब्बल 6 हजार 445 जणांना कोविडची लागण झाली आहे. दुर्दैवाने  या महिन्यात कोविडने  मृत्यू होण्याच्या दरातही  मोठी वाढ झाल्याचे समोर आले.  एप्रिल या एकाच महिन्यात  शहरासह संपूर्ण तालुक्यातून  सुमारे दोनशेहून अधिक जणांचे जीवही गेले.  सरकार दरबारी मात्र  या मृत्यूच्या नोंदी करण्यात आलेल्या नाहीत.  
काल संपलेल्या एप्रिल मधील तीस दिवसात तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोविड प्रादुर्भावाची गती तब्बल 178 रुग्ण दररोज इतकी प्रचंड होती. त्यामुळे महिनाभरात एकट्या ग्रामीण भागाच्या रुग्ण संख्येत 5 हजार 328 रुग्णांची भर पडली. त्यामुळे ग्रामीण भागातील एकूण रुग्णसंख्या 11 हजार 699 वर पोहोचली आहे. तर गेल्या महिन्याभरात शहरी भागातील सरासरी तालुक्यातील प्रचंड संक्रमणातही दिलासादायक राहिली. गेल्या तीस दिवसात संगमनेर शहरातील रुग्णगती अवघी 37.23 इतकी होती. त्यामुळे एकीकडे ग्रामीण भागात रुग्ण संख्येचे दररोज उच्चांक नोंदवले जात असतानाच शहरात मात्र अवघ्या 1 हजार 117 रुग्णांची भर पडली. आत्तापर्यंत शहरातील एकूण 3 हजार 853 जणांना कोविडची लागण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *