उत्तर नगर जिल्ह्यात महिनाभरात आढळले तीस हजार रुग्ण! राहाता तालुक्यात साडेसहा हजारांहून अधिक तर नेवाशात तीन हजार रुग्णांची भर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात एप्रिलमध्ये उसळलेल्या कोविडच्या दुसर्‍या संक्रमणाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 29 दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात दररोज सरासरी 2 हजार 627 रुग्ण या गतीने तब्बल 78 हजार 181 रुग्णांची भर पडली आहे. त्यात उत्तरेतील सात तालुक्यांत सरासरी 1 हजार 44 रुग्ण रोज या गतीने 30 हजार 288 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दररोज 26 रुग्ण या प्रमाणे महिन्यातील 29 दिवसांतच जिल्ह्यातील 743 रुग्णांचा बळीही गेला आहे. जिल्ह्यातील संक्रमणाची गती अद्यापही कायम असून सध्या सुरु असलेल्या ‘लॉकडाऊन’चा त्यावर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.

राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासूनच कोविड संक्रमणाचा अक्षरशः उद्रेक झाला. त्यात अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश आहे. गेल्या अवघ्या 29 दिवसांतच जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत दररोज सरासरी 2 हजार 627 इतक्या प्रचंड गतीने 76 हजार 181 रुग्णांची भर पडली. यात सर्वाधीक 624.58 सरासरी एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्राची आहे. त्या खालोखाल राहाता तालुक्यात कोविडने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचेही प्राप्त आकडेवारीवरुन दिसून येते. राहात्यात गेल्या 29 दिवसांत सरासरी 229 रुग्ण रोज या गतीने तब्बल 6 हजार 635 रुग्णांची भर पडली आहे. ही सरासरी केवळ उत्तर नगर जिल्हाच नव्हेतर संपूर्ण जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकाची आहे.

नगर ग्रामीण क्षेत्रातील सरासरीही दोनशेहून अधिक असून गेल्या 29 दिवसांत या भागातून दररोज 205 रुग्ण या गतीने 5 हजार 947 रुग्णांची भर पडली आहे. संगमनेर तालुक्याच्या रुग्णवाढीचा वेगही मोठा असून जिल्ह्यात चौथ्या क्रमांकाचे रुग्ण तालुक्यातून समोर आले आहे. आजच्या स्थितीत संगमनेर तालुक्यातून दररोज 177 रुग्ण समोर येत असून आत्तापर्यंतच्या महिन्यातील 29 दिवसांत तब्बल 5 हजार 142 रुग्णांची भर पडली आहे. कोविडच्या पहिल्या संक्रमणातील सर्वाधीक रुग्णसंख्येपेक्षा ही संख्या तिपटीहून कितीतरी अधिक आहे. संगमनेर खालोखाल दक्षिणेतील कर्जत तालुक्यात आश्चर्यकारकपणे कोविडचा प्रादुर्भाव वाढला आणि तेथील रुग्णगती थेट 157 रुग्ण दररोज या गतीवर पोहोचली. आत्तापर्यंत कर्जत तालुक्यातून तब्बल 4 हजार 553 रुग्ण समोर आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातही कोविडचा मोठा उद्रेक झाल्याचे चालू महिन्यात दिसून आले. श्रीरामपूरमध्ये दररोज 143 रुग्ण या वेगाने आत्तापर्यंत 4 हजार 155, कोपरगाव तालुक्यात सरासरी 137 रुग्ण या वेगाने 3 हजार 961 रुग्ण, राहुरी तालुक्यात सरासरी 136 रुग्णगतीने 3 हजार 935 रुग्ण, अकोले तालुक्यात सरासरी 118.48 या गतीने 3 हजार 436 रुग्ण, पाथर्डी तालुक्यात सरासरी 116 रुग्ण या वेगाने 3 हजार 353 रुग्ण, शेवगाव तालुक्यात सरासरी 115 रुग्ण या वेगाने 3 हजार 323 रुग्ण, पारनेर तालुक्यात सरासरी 107 रुग्ण या गतीने 3 हजार 107 रुग्ण, नेवासा तालुक्यात सरासरी 104 रुग्ण या गतीने 3 हजार 24 रुग्ण, श्रीगोंदा तालुक्यात सरासरी 87 रुग्ण या गतीने 2 हजार 521 रुग्ण तर जामखेड तालुक्यात सर्वाधिक कमी 67 रुग्णगतीने 1 हजार 922 रुग्णांची भर पडली आहे.

अहमदनगर महापालिका क्षेत्रात कोविड संक्रमणाचा वेग मोठा असल्याने दक्षिणेतील सरासरी उंचावली आहे. अहमदनगरसह दक्षिणेतील सात तालुक्यांमध्ये गेल्या 29 दिवसांत सरासरी दररोज 1 हजार 583 रुग्ण यागतीने तब्बल 45 हजार 893 रुग्णांची भर पडली आहे. यात भिंगार लश्करी परिसरातील 1 हजार 777, लष्करी रुग्णालयातील 202, इतर जिल्ह्यातील 1 हजार 47 आणि इतर राज्यातील 28 अशा एकूण 3 हजार 54 रुग्णांचा समावेश आहे. तर उत्तरेतील राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, अकोले व नेवासा या तालुक्यांमधून सरासरी 1 हजार 44 रुग्ण रोज या गतीने तब्बल 30 हजार 288 रुग्णांची वाढ झाली आहे.

देशातील अनेक राज्यात कोविड संक्रमणाचा उद्रेक झाला, त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यातही राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, अहमदनगर व सोलापूर या दहा जिल्ह्यात संक्रमणाची गती प्रचंड असून पुढील 12 दिवसांत राज्यातील या दहा जिल्ह्यांच्या संक्रमणात प्रचंड मोठी वाढ होण्याची शक्यता असून 11 मे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 37 हजारांहून अधिक असेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सध्या जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 22 हजार 464 आहे. यावरुन पुढील दहा दिवसांतील संक्रमणाचा अंदाज सहज लावता येवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता असून नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *