प्यायला पाणी मागणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी? हंगेवाडीच्या ग्रामसेवकाने गावकर्‍यांनाच धमकावल्याचा होतोय आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण संगमनेर तालुका हादरलेला असतांना व शासकीय यंत्रणा नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आटापीटा करीत असतांना हंगेवाडीतून कोविडपेक्षाही भयानक प्रकार समोर आला आहे. गेल्या महिन्याभरापासून नळांना पाणीच येत नसल्याची तक्रार घेवून गेलेल्या गावातील नागरिकांनाच ग्रामसेवकाने धमकावले असून जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पिण्यासाठी पाणी मागणे गुन्हा असेल तर तो देखील मान्य असल्याचे सांगत संबंधितांनी मुजोर ग्रामसेवकाविरोधात सरपंचाकडे तक्रार केली आहे.

याबाबत मालुंजे गावातंर्गत येणार्‍या हंगेवाडीतील काही गावकर्‍यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्याभरापासून हंगेवाडीतील अनेक घरांना नळाचे पाणीच येत नाही. त्यामुळे कोविडच्या भयातही महिला, मुले व वृद्धांना पायपीट करीत पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीला अनेकवेळा आर्जवे करुनही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने काही ग्रामस्थांनी एकत्रित होवून ग्रामसेवकाला पाणी देण्याबाबत निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार पाण्याची अडचण दूर करण्याबाबत ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा करण्याऐवजी त्यांनी कलम 144 चा धाक दाखवित गुन्हा दाखल करण्याची धमकीच देवून टाकली असा आरोप हंगेवाडीतील काही ग्रामस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

ग्रामसेवकाच्या या भूमिकेनंतर संबंधितांनी हंगेवाडीच्या सरपंचाकडे लेखी स्वरुपात गार्‍हाणे मांडले असून गावकर्‍यांशी असभ्य भाषेत बोलणार्‍या ग्रामसेवकाची तक्रारही केली आहे. त्यासोबतच पाण्यावाचून माणसं व जनावरांचे हाल होत असून लवकरात लवकरात पाण्याची समस्या दूर करुन आम्हाला पिण्यासाठी पाणी द्यावं अशी मागणी केली आहे. या निवेदनावर बेबी सांगळे, सुरेखा पवार, पल्लवी सांगळे, ऐश्वर्या सांगळे, वनिता सूर्यवंशी, सारीका गाडेकर, ताराबाई पवार, संदीप बिडवे, वल्लभ सांगळे, पूजा पवार, श्वेता बुरकूल, जिजाबाई पवार, मंदा सातपुते, अक्षय बुरकूल, मंदाकिनी सानप, नंदा कांबळे, संगीता कांबळे, निशा सांगळे, लहानबाई कांगणे, मीराबाई घुगे, जगूबाई साळवे, विमल क्षीरसागर, शांताबाई जाधव, भारती जाधव, चाँदभाई पठाण, बबुबाई पठाण, रोहिणी सांगळे, मीना पवार, कलाबाई पवार, कविता बुरकूल आदी महिला ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवत असते. अशा ठिकाणी पंचायत समितीमार्फत टँकरने पाणी पुरवठा केला जातो. हंगेवाडीत मात्र मानवनिर्मित पाण्याची टंचाई जाणवत असल्याचे दिसत असून ग्रामसेवकाच्या मनमानीमुळे गावातील अनेक घरांना पाणीच मिळत नसल्याचे समोर आले आहे. भर उन्हाळ्यात जाणवत असलेल्या या पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी ग्रामसेवकाकडे त्याबाबत विचारणा केली असता उलट त्यांनीच गावकर्‍यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने हंगेवाडीतील महिला संतप्त झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *