बोटा कोविड केअर सेंटर ठरतेय मायेचा आधार! पंचवीस दिवसांत शंभर रुग्ण उपचारांती ठणठणीत बरे..

नायक वृत्तसेवा, घारगाव
जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा येथे सुरू असलेले कोविड केअर सेंटर खर्‍या अर्थाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी मायेचा आधार ठरत आहे. अवघ्या पंचवीस दिवसांत या कोविड सेंटरमधून शंभर कोरोनाबाधित रुग्ण उपचारांती ठणठणीत बरे होवून बाहेर पडले आहेत. यामुळे पठारभागातील गोरगरीब रुग्णांनी सेवा देणार्‍यांचे आभार मानले आहे.

सध्या कोरोनाने सगळीकडेच हाहाकार माजवला आहे. दवाखाने रुग्णांनी भरून गेली आहेत. अनेकांना खाटा, प्राणवायू व रेमडेसिविर मिळणे मुश्किल होत आहे. हीच गरज लक्षात घेऊन पठारभागातील कोरोनाबाधित रुग्णांचे हाल होवू नये म्हणून जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखालील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बोटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉ.अतीश कापसे व डॉ.अमोल भोर उपचार करत आहे.

विशेष बाब म्हणजे 5 एप्रिलला कोविड सेंटर सुरू झाले असून आत्तापर्यंत येथून शंभर रुग्ण यशस्वी उपचारांती ठणठणीत बरे होवून घरी परतले आहेत. सध्या पस्तीस रुग्णांवर उपचार चालू आहेत. मध्यंतरी रुग्णांसाठी खाटा कमी पडल्या होत्या, म्हणून मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. अजूनही मदतीचा ओघ सुरूच असून, पठारभागातील गरजूंसाठी खर्‍या अर्थाने बोटा कोविड केअर सेंटर मायेचा आधार बनले आहे. यामुळे नागरिक जिल्हा परिषद सदस्य फटांगरे व आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांचे आभार मानत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *